Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

पंडित भीमसेन जोशी हे साधक कलाकार – उस्ताद उस्मान खान

पुणे  : ” भारतरत्न पंडित भीमसेन जोशी हे साधक कलाकार होते. संगीताची साधना निरपेक्षपणे करावी लागते, तरच त्यामध्ये सिद्धी प्राप्त होते. पंडितजी हे अशीच सिद्धी प्राप्त झालेले आदर्श कलाकार होते,” अशी भावना प्रसिद्ध सतारवादक उस्ताद उस्मान खान यांनी व्यक्त केली.

सवाई गंधर्व यांचे नातू आणि भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य पं. श्रीकांत देशपांडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून पं. देशपांडे यांच्या पत्नी शीला देशपांडे आणि श्रीकांत देशपांडे मित्रमंडळातर्फे ‘संगीत संध्या’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे यंदाचे दहावे वर्ष असून, भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा कार्यक्रम त्यांना समर्पित करण्यात आला.  उस्ताद उस्मान खान हे याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भरत नाट्य मंदिराचे नवनियुक्त अध्यक्ष तबलावादक पं. पांडुरंग मुखडे यांचा उस्ताद उस्मान खान यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. आर्य संगीत प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास जोशी, अलाहाबाद विद्यापीठाचे माजी कुलगुरू राजन हर्षे हे उपस्थित होते.

पं. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा देत हर्षे म्हणाले, “ श्रीकांतचे गाणे इतके मंत्रमुग्ध करणारे होते,  की श्रोते त्यांच्या गाण्यात हरवून जायचे. विविध ठिकाणी आपल्या गायनाने त्यांनी अनेक मैफिली गाजविल्या आहेत.  नवीन कलाकारांना सादरीकरणाची संधी मिळावी आणि शास्रीय संगीताचा प्रसार व्हावा, या त्यांचा  स्वप्नांची त्यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाच्या माध्यमातून पूर्तता व्हावी ही अपेक्षा आहे.’’

 कार्यक्रमात भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी आणि किराणा घराण्याचे गायक पं. जयतीर्थ मेवुंडी आणि यांनी आपले गायन सादर केले.  कार्यक्रमाची सुरवात विराज जोशी यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग मुलतानीमध्ये विलंबित ख्यालात  ‘गोकुल गाव का छोरा’ ही बंदिश, त्यानंतर दृत तीन तालामध्ये ‘कंगन मुंदरिया मोरी’ ही बंदिश सादर केली.  भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या ‘माझे माहेर पंढरी ‘ या गीताच्या सादरीकरणाने त्यांनी मैफिलीचा शेवट केला. हा गीताला  रसिकांनी टाळ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद दिला.

 पं. जयतीर्थ मेवुंडी यांनी राग दुर्गामधील ‘तू रस कान्हा’ हा विलंबित दृत तीन तालाद्वारे गायनास सुरवात केली. त्यानंतर त्यांनी  राग छाया मल्हार मधील ‘सखी शाम नहीं आए’ आणि ‘जादू भरेली नयना रसेली’ ही गारा ठुमरी सादर केली. पं. मेवुंडी यांनी  संत तुकारामांच्या  ‘लै नाही मागणं’ या अभंग सादरीकरणाने कार्यक्रमाचा समारोप केला.

दोन्ही कलाकारांना माऊली टाकळकर यांनी टाळ वादनसाठी, तबला साथ भरत कामत, संवादिनी साथ सुयोग कुंडलकर, तानपुरा किरण नायक यांनी केली.  आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading