पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या सेवेतून माहे मे २०२२ मध्ये सेवानिवृत्त झालेले अधिकारी सुनिल गवळी, सुनिल बुरसे व कैलास गावडे यांचा पीएमआरडीएचे प्लॅनिंग कमिटीचे सल्लागार, ‘पीएमटी’चे माजी चेअरमन, ‘पीएमपीएमएल’चे माजी संचालक व पुणे महानगरपालिकेचे माजी सभासद अजित आपटे, पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा व सहव्यवस्थापकीय संचालक मा. डॉ. चेतना केरूरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पीएमपीएमएलचे जनरल मॅनेजर (ऑप. अॅण्ड इंजि.) सुनिल गवळी, चिफ मेकॅनिकल इंजिनीअर, सुनिल बुरसे, झोनल मॅनेजर कैलास गावडे यांचा दि. ३१ मे रोजी सेवानिवृत्ती निमित्त स्वारगेट प्रशासकीय इमारत येथील ट्रेनिंग हॉल येथे आयोजित कार्यक्रमात सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुणेरी पगडी, तुळशीचे रोप, शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी पीएमपीएमएलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा पोतदार, पीएमपीएमएलचे जनरल मॅनेजर (अॅडमिन अॅण्ड एच.आर.) सुबोध मेडसीकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना पीएमआरडीएचे प्लॅनिंग कमिटीचे सल्लागार अजित आपटे म्हणाले, “पीएमपीएमएल ही लोकांची सेवा करणारी संस्था आहे. अशा संस्थेत काम करण्याची संधी अधिकाऱ्यांना मिळाली. या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना माझे सांगणे आहे की पीएमपीएमएलशी असलेली नाळ तुटू देऊ नका. पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्कात राहून विचारविनिमय करत रहा.”
पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा म्हणाले, “आज सेवानिवृत्त होत असलेल्या या तिन्ही अधिकाऱ्यांचे काम प्रेरणादायी असून भविष्यात देखील त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा संस्थेच्या प्रगतीसाठी उपयोग होण्याच्या दृष्टीने त्यांनी सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन व सहकार्य करावे.”
सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरूरे म्हणाल्या, “आज पीएमपीएमएलचे जे अधिकारी सेवानिवृत्त झाले; त्यांनी अत्यंत उत्कृष्ट काम केले आहे. त्यांच्या ठिकाणी येणाऱ्या अधिकाऱ्यांनीही त्यांच्या प्रमाणेच काम करून संस्थेला प्रगतीपथावर न्यावे.”
कार्यक्रमास पीएमपीएमएल चे सर्व डेपो मॅनेजर, असि. डेपो मॅनेजर, डेपो मेंटेनन्स इंजिनिअर व कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन कामगार व जनता संपर्क अधिकारी सतिश गाटे यांनी केले तर आभार मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी मानले.
