fbpx
Thursday, May 2, 2024
Latest NewsPUNE

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ सोहळा रंगणार राष्ट्रपतींच्या उपस्थितीत

पुणे : बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५ व्या) वर्षाचा शुभारंभ सोहळा शुक्रवार, दिनांक २७ मे रोजी दुपारी १२ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रताप परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, खजिनदार महेंद्र पिसाळ, उत्सवप्रमुख अ‍ॅड.रजनी उकरंडे, उप उत्सवप्रमुख युवराज गाडवे, ज्येष्ठ विश्वस्त सुनिल रुकारी, डॉ.पराग काळकर, अक्षय हलवाई आदी उपस्थित होते.

शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष शुभारंभ सोहळयाला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, यंदाच्या लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार २०२२ चे वितरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. उद्यानकृषी क्रांतीच्या जनक असलेल्या राईज अ‍ँड शाईन बायोटेक प्रा. लि. च्या चेअरमन व कार्यकारी संचालिका आणि डॉ.डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ पिंपरीच्या प्र-कुलगुरु डॉ.भाग्यश्री पाटील, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनंट जनरल डॉ.माधुरी कानिटकर आणि आंतरराष्ट्रीय बोन्साय तज्ञ डॉ. प्राजक्ता काळे यांना यंदाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, महावस्त्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

श्री दत्तमंदिराच्या १२५ वर्षाच्या कार्याचा आढावा घेणा-या लक्ष्मीदत्त या कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते यावेळी होईल. कार्यक्रम सुरक्षेच्या कारणास्तव निमंत्रितांसाठी असून प्रवेशिकेशिवाय कोणालाही प्रवेश देता येणार नाही. पुणेकरांना घरबसल्या कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या यू टयूब आणि फेसबुक पेजवरुन या सोहळा लाईव्ह पाहता येणार आहे. तरी नागरिकांनी आॅनलाईन सुविधेद्वारे कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading