जन्मदात्या बापानेच केली दहा वर्षांच्या चिमूकल्याची हत्या, कारण वाचून तुम्हालाही येईल संताप
नागपूर : जन्मदात्या बापानेच आपल्या केवळ दहा वर्षांच्या मुलाची घरी पाणी भरत नाही, या शुल्लक कारणावरून हत्या केल्याची घटना नागपुरात उघडकीस आली आहे. कोराडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत सुरादेवी येथील झोपडपट्टीत ही घटना घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गुलशन उर्फ गबरू मडावी ( वय -10) असे मृत मुलाचे नाव आहे. तर संतलाल मडावी असे या नर्दयी बापाचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली असून त्याने गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, सुरादेवी परिसरातील झोपडपट्टीत गुलशन उर्फ गबरू हा आपली बहीण व वाडीलांसोबत राहत होता. वडील आरोपी संतलाल मडावी हा चाकू आणि कैचीला धार लावण्याचा व्यवसाय करतो. संतलालला दारूचे व्यसन असल्याने त्याची पत्नी चार वर्षांपूर्वी विभक्त झाली होती. तेव्हापासून संतलाल दारू पिऊन दोन्ही मुलांना रोज मारहाण करायचा. रविवारी दुपारी गुलशनला घरी पाणी न भरल्यामुळे आरोपी बापाने प्रचंड मारहाण केली. एवढ्यावर त्याचे समाधान न झाल्याने त्याने घरात नेऊन त्याचा गळा आवळून हत्या केली. घटनेच्या वेळी मृतकची बहीण घराबाहेर गेली होती. कुणालाही काहीही कळू नये यासाठी संतलालन घराचे दार बंद करून मुलीला घेऊन बाहेर पडला आणि भाऊ महादूच्या घरी गेला. काही तासाने तो, त्याचा भाऊ, भावाची पत्नी आणि मुलगी हे सर्व घरी परतले. तेव्हा गुलशन कुठेच दिसून न आल्यामुळे त्याचा शोध सुरू करण्यात आला. पण मुलाची हत्या केली असून त्याचे मृतदेह घरात पडून आहे हे माहित असून सुद्धा संतलालने मुलाला शोधण्याचा बनाव केला.
थोड्यावेळाने मुलाचा मृतदेह घरात आढळल्यानंतर त्याने माझ्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा कांगावा सुरू केला घटनेची माहिती समजताच कोराडी पोलिसांनी घटनास्थळी गाठले. घटनेबद्दल संशय असल्याने पोलिसांनी संतलालला ताब्यात घेत विचारपूस सुरू केली. पोलिसी खाक्या दाखवताच संतलालने आपला गुन्हा कबूल केला आहे. एसीपी संतोष खांडेकर आणि पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर हे पुढील तपास करीत आहेत.
