Tuesday, June 16, 2026
Latest NewsSports

सिल्व्हर करंडक – एजे स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी संघाला विजेतेपद !!

पुणे : सिल्व्हर क्रिकेट अ‍ॅकॅडमी तर्फे आयोजित पहिल्या ‘सिल्व्हर करंडक’ अजिंक्यपद १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत पनवेलच्या एजे स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी संघाने सिल्व्हर क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाचा २ गडी आणि ४ चेंडू राखून उत्कंठावर्धक विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.

सिल्व्हर क्रिकेट अ‍ॅकॅडमी मैदान, चिखली येथे झालेल्या स्पर्धेत नाणेफेक जिंकून सिल्व्हर क्रिकेट अ‍ॅकॅडमीने पहिल्यांदा फलंदाजी निवडली व २५ षटकात ६ गडी गमावून १४५ धावांचे आव्हान उभे केले. प्रज्वल पवार याने ५७ धावांची खेळी केली. रूद्र किरदत (३७ धावा) आणि अर्णेश रॉय (२६ धावा) यांनीही संघाच्या डावाला आकार दिला.

या आव्हानाचा पाठलाग करताना एजे स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीने सावध सुरूवात केली. गुरूवेश जगताप (४७ धावा) आणि विराज खानावकर (१७) या दोघांनी संघाचा डाव सावरून संघाला विजयाच्या समीप नेले. यानंतर अविनाश भारद्वाज याने नाबाद ३७ धावांची खेळी करून मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करून संघाचा विजय साकार केला. एजे संघाने २४.२ षटकात विजय संपादन केला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी रणजीपटू श्रीकांत जाधव यांच्या हस्ते पार पडला. यावेळी सिल्व्हर ग्रुपचे संचालक किरण सावंत, सतीश बग, अशोक बग, सोमनाथ सस्ते, मुख्य क्रिकेट प्रशिक्षक राजू कोतवाल उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू कोतवाल यांनी तर, आभार कैलास डांगे यांनी मानले.

स्पर्धेतील विजेत्या संघाला एजे स्पोर्ट्स संघाला आणि उपविजेत्या सिल्व्हर क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाला करंडक व मेडल्स् देण्यात आली. या शिवाय स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात आली. अमन सिंग (डॉमनिक सीए) याला मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू; इशान मानकर (सिल्व्हर अ‍ॅकॅडमी) याला सर्वोत्कृष्ट फलंदाज तसेच आयुश मेहता (एजे स्पोर्ट्स) याला सर्वोत्कृष्ट गोलंदाज अशी पारितोषिके देण्यात आली.

अंतिम फेरीः सामन्याचा संक्षिप्त धावफलकः
सिल्व्हर क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २५ षटकात ६ गडी बाद १४५ धावा (प्रज्वल पवार ५७ (५१, ५ चौकार, १ षटकार), रूद्र किरदत ३७, अर्णेश रॉय २६, क्रिश पाटील १-१८) पराभूत वि. एजे स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीः २४.२ षटकात ८ गडी बाद १४८ धावा (गुरूवेश जगताप ४७ (३७, ५ चौकार, १ षटकार), अविनाश भारद्वाज नाबाद ३७ (१९, २ चौकार, २ षटकार), विराज खानावकर १७, शौमिक हजारनिस ३-१२); सामनावीरः अविनाश भारद्वाज;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading