कोल्हापूर, पालघर संघांना विजेतेपदाचा मुकुट

राज्य कबड्डी स्पर्धा : पुणे, मुंबई उपनगर संघांना उपविजेतेपद

पुणे / प्रतिनिधी : मुलांच्या गटात कोल्हापूर संघाने मुंबई उपनगर संघाला तर मुलींच्या गटात पालघर संघाने पुणे संघाला पराभूत करताना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या मान्यतेने व जिल्हा कबड्डी संघटना यांच्या सहकार्याने युवानेते पार्थ पवार, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष संदीप बालवडकर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ४८ व्या कुमार – कुमारी गटाच्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेच्या विजेतेपदाचा मुकुट पटकावला.

पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार क्रीडानगरी, मेट्रो ग्राउंड, साई चौक बालेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत मुलांच्या गटाच्या अंतिम लढतीत कोल्हापूर संघाने मुंबई उपनगर संघावर ४०-२७ असा विजय साकारताना स्व. नारायण नागो पाटील, रायगड फिरत्या चषकासह विजेतेपद पटकावले. मध्यंतराला कोल्हापूर संघाने २४-९ अशी तब्बल १५ गुणांची आघाडी मिळविली. कोल्हापूर संघाच्या कुणाल जगताप (९ गुण) व स्वराज्य साळवी (३ गुण) यांनी चढाया करताना तर दादासाहेब पुजारी व साईप्रसाद पाटील यांनी पकडी करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मुंबई उपनगर संघाच्या रजत सिंग, आकाश रडले, साहिल नलावडे व आकाश तावडे यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.

मुलींच्या गटाच्या अंतिम लढतीत पालघर संघाने पुणे संघाला ३२-३० अशी २ गुणाच्या फरकाने मात करताना स्व. चंदन पांडे फिरता चषकासह विजेतेपद पटकावले. मध्यंतराला दोन्ही संघ १९-१९ असे समान गुणांवर होते. मध्यंतरानंतर पालघर संघाने आक्रमक खेळाला सुरुवात केली. पालघर संघाच्या हर्षा शेट्टी व ज्युली मिस्किटा यांनी आक्रमक चढाया करताना तर श्रुती सोमासे व रेणुका नम यांनी पकडी करतना संघाचा गुणफलक हलता ठेवला. पुणे संघाकडून अनुष्का फुगे, समृद्धी कोळेकर यांनी चढाया व भूमिका गोरे, शीफा वस्ताद यांनी चांगल्या पकडी केल्या परंतू त्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरल्या.

मुलींच्या गटाच्या तृतीय क्रमांकाच्या लढतीत सांगली संघाने मुंबई शहर संघावर ४६-२९ असा दणदणीत विजय मिळविला. मधंयतराला सांगली संघाकडे २३-१७ अशी आघाडी होती. सांगलीच्या ऋतुजा आंबी व आर्या पाटील यांनी चांगला खेळ करीत विजय मिळविला. मुंबई शहर संघाच्या भारती यादव व साक्षी सावंत यांनी चांगला प्रतिकार केला. मुलांच्या तृतीय क्रमांकासाठी झालेल्या अत्यंत अटीतटीच्या लढतीत पालघर संघाने परभणीवर ३५-३२ अशी मात केली. मध्यंतराला पालघर संघ १३-१७ असा पिछाडीवर होता. पालघरच्या प्रतिक जाधव व पियुष पाटील यांनी चांगला खेळा केला. तर परभणीच्या प्रसाद रुद्राक्ष व सिद्देश्वर गऴळी यांनी चांगला प्रतिकार केला.

तत्पूर्वी,  मुलांच्या गटाच्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये कोल्हापूर संघाने पालघर संघावर ३७-३३ असा विजय मिळविताना अंतिम फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला पालघर संघाने १९-१३ अशी आघाडी मिळविली होती. कोल्हापूर संघाच्या कुणाल जगताप व ओंकार पाटील यांनी दमदार चढाया करताना तब्बल १२ गुणांची कमाई केली. त्यांना साईप्रसाद पाटीलने ५ पकडी करताना विजयात हातभार लावला.पालघर संघाकडून पियुष पाटील, यांने चढाई करताना तर राज साळुंखेने पकडी करताना चांगला प्रतिकार केला.

मुलांच्या गटाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत मुंबई उपनगर संघाने परभणी संघाला २५-२४  असे केवळ एका गुणाने पराभूत केले. मध्यंतराला मुंबई उपनगर संघाने १५-९ अशी ६ गुणांची आघाडी घेतली. मुंबई संघाकडून रजत सिंग, यश डोंगरे यांनी एकत्रित ११ गुणांची कमाई केली. रोहित सिंग व साहिल नलावडे यांनी पकडी केल्या. पराभूत परभणी संघाकडून प्रसाद रुद्राक्ष याने चढाईत ८, पंकज राऊतने ४ तर वैभव कांबळे, अरविंद राठोड यांनी प्रत्येकी ४ पकडी केल्या.

स्पर्धेचे बक्षीस वितरण सुनेत्रा अजित पवार, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुणे शहर राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप, स्पर्धेचे मुख्य आयोजक संदीप बालवडकर, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह आस्वाद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवकचे मेहबूब शेख पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपकार्याध्यक्ष राजेंद्र देशमुख, पुणे शहर युवक राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यश्र किशोर कांबळे, दत्तात्रय बालवडकर, संजय बालवडकर, नितीन बालवडकर, शाम बालवडकर, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्याध्यक्षा वासंती बोर्डे, सरकार्यवाह रविंद्र आंदेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा भोसले यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: