Wednesday, April 8, 2026
Latest NewsPUNE

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शाहू महाराजांना अभिवादन

पुणे: देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एकीकडे राजकीय पाळीवर लढा सुरू होता, तर दुसरीकडे जातीभेद, अस्पृश्यता, शिक्षणाचा अभाव यांसारख्या सामाजिक कुप्रथांविरोधात सामाजिक स्वातंत्र्याचा लढा सुरू होता, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजर्षि शाहू महाराजांचे योगदान होते, असे मत ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राजर्षि शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी निमित्त आयोजित व्याख्यानादरम्यान ते बोलत होते. यावेळी सुरुवातीला विद्यापीठातील शाहू महाराजांच्या पुतळ्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी व कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, विद्यापीठाचे अधिसभा सदस्य राजेश पांडे, संदीप खर्डेकर आदी मान्यवरही उपस्थित होते.

यावेळी बलकवडे म्हणाले, देश जेव्हा ब्रिटिश राजवटीखाली होता तेव्हा राजकीय स्वातंत्र्यासाठी लढल्यास आपले संस्थान खालसा केलं जाऊ शकते याची जाणीव शाहू महाराजांना होती, त्यांना आपल्या मर्यादा माहित होत्या. तसेच राजकीय स्वातंत्र्याबरोबर सामाजिक रुढीपरंपरेतून बाहेर पडण्याची गरज भारताची गरज त्यांनी ओळखली होती म्हणून त्यांचा लढा हा सामाजिक स्वातंत्र्यांसाठी त्यांनी सुरू केला होता.

डॉ. नितीन करमळकर म्हणाले, कोणत्याही महापुरुषाला जातीच्या कुंपणात न बांधता त्यांच्या कार्याचा सापेक्ष अभ्यास होणे गरजेचे आहे. शाहू महाराजांनी सर्वांच्याच शिक्षणासाठी प्रयत्न केले. लोकांच्या रोजगारासाठी प्रयत्न केले. आपण यातून काय शिकलो आणि अंमलात आणले हे मला आजच्या काळात महत्त्वाचे वाटते.

शाहू महाराज हे लोकनेते होते- चंद्रकांत पाटील

राजर्षि शाहू महाराज हे लोकनेते होते. राधानगरी हे पहिलं धरण त्यांनी बांधलं, आजही या धरणावर तेथील एक तृतीयांश शेती होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी मदत केली. आरक्षण हे शाहू महाराजांच्या काळातच सुरू झाले. आज शंभर वर्षांनंतरही त्यांचे विचार हे आधुनिक आहेत असेही पाटील म्हणाले. यावेळी पाटील यांनीही महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading