‘सरनोबत’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांसाठी होणार सज्ज

महाराष्ट्राला ख-या अर्थाने महान राष्ट्र बनविणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाने व शेकडो मावळयांच्या बलिदानाने मराठा स्वराज्य उभारले गेले. महाराजांशी निष्ठा व स्वराज्य रक्षणाची तळमळ प्रत्येक मावळ्याच्या नसा-नसात भिनली होती. शेकडो वीरांच्या शौर्याची साक्ष मातीचा कण आणि कण देत आहे. स्वराज्य रक्षणासाठी प्राणांची आहुती दिलेल्या वीरांच्या आठवणींशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होत नाही. अशाच शूरवीराच्या गाथेला उजाळा देण्यास जैन फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत, निर्माते गौतम मुथा निर्मित आणि दिपक कदम दिग्दर्शित, ‘सरनोबत’ हा भव्यदिव्य चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीस येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर आणि मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. मराठीसह हा चित्रपट हिंदी आणि तेलगू भाषेतही प्रदर्शित होणार आहे.
दिग्दर्शक दिपक कदम यांनी सरनोबत चित्रपटातून वेडात मराठे वीर दौडले सात असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते त्या शूर सेनाण्यांचा म्हणजेच प्रतापराव गुजर, विसाजी बल्लाळ, दिपोजी राउतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्दी हिलाल व विठोजी शिंदे यांचा पराक्रम हुबेहूब मांडण्याचा प्रयत्न केला आहे. याआधी दिपक कदम यांनी ‘पुरषा’, ‘ऍट्रोसिटी’, ‘एका लग्नाची गोष्ट’, ‘नगरसेवक एक नायक’, ‘वाक्या’, ‘गोल माल प्रेमाचा’, ‘संसाराची माया’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून त्यांनी अनेक मालिकांचेही दिग्दर्शन केले आहे.  लवकरच दिपक हिंदी भाषिक ऐतिहासिक ‘सरनोबत’ हा चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीस घेऊन येण्यास सज्ज झाले आहेत.
या चित्रपटाला देव – सुचिर यांनी संगीत दिले असून, एस. के. वल्ली यांनी यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात या चित्रपटाची भव्यदिव्यता चित्रित केली आहे. चित्रपटाची संकल्पना संजय कसबेकर, दिपक कदम यांची असून चित्रपटाची कथा अभिजित कुलकर्णी लिखित आहे. चित्रपटाच्या व्हिएफएक्सची जबाबदारी  ऍनिमेक डिझाइन आणि राहुल बाबासाहेब साळुंखे यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: