अभिजात भाषेसाठी आता लोकचळवळीची गरज – विश्वजित कदम

पुणे : “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. यासाठी अनेक शिष्टमंडळाने केंद्र सरकारची भेटदेखील घेतली आहे. मात्र, अद्याप मराठीला अभिजात दर्जा मिळालेला नाही. हा दर्जा मिळावा, यासाठी आता लोकचळवळ उभी करण्याची गरज आहे, असे मत मराठी राज्यभाषा मंत्री विश्वजित कदम यांनी केले.

दुसऱ्या मराठी सोशल मीडिया संमेलनाच्या समारोपप्रसंगी कदम बोलत होते. डिजिटल मीडियाप्रेमी मंडळ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मिरॅकल इव्हेंटस् सहआयोजित या संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, प्रा. संजय चाकणे, विद्यापीठाच्या मराठी भाषा विभागाचे विभागप्रमुख प्रभाकर देसाई, प्लॅनेट मराठीचे कंटेंट हेड सुनील बोधनकर, संमेलनाचे संयोजक प्रदीप लोखंडे, मंगेश वाघ आणि समीर आठल्ये यावेळी उपस्थित होते.

कदम म्हणाले, “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, अशी सरकार आणि साहित्यिक अशा सर्वांची सातत्याने केंद्र सरकारकडे मागणी सुरू आहे. अनेकांनी ही मागणी करणारे असे ५० लाख पोस्टकार्ड केंद्र सरकारला पाठवले. मात्र त्याला अजूनही केंद्र सरकारने प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे आता लोकांनीच यासाठी चळवळ सुरू करावी.”

सोशल मीडियाचा प्रभाव खूप मोठा आहे. मराठी भाषेत आयोजित या संमेलनाप्रमाणेच देशभरात अशी स्थानिक भाषेतील संमेलने सुरू होतील, असा विश्वास देखील कदम यांनी यावेळी व्यक्त केला.

डॉ करमळकर म्हणाले, “गेली पाच वर्षे कुलगुरू म्हणून काम करताना अनेकदा मला तुमचे सोशल मीडिया अकाउंट नाही का? अशी विचारणा झाली. माध्यमे, समाजमाध्यमे यांच्यावरील नकारात्मक बातम्या, कमेंट वाचून तुम्ही अधिक ऊर्जेने काम करू शकत नाही. सकारात्मक राहायचे असेल तर या माध्यमापासून थोडे अंतर ठेवले पाहिजे या उद्देशाने मी समाजमाध्यमावर कार्यरत नाही. मात्र, याचा हा अर्थ मुळीच नाही की मला अथवा विद्यापीठाला या माध्यमाबाबत आस्था नाही. सोशल मीडिया ही एक शक्ती आहे. त्याच्या माध्यमातून अनेक कामे होतात. त्यामुळे त्याची सर्वांनी दाखल घेणे गरजेचे असून, त्याचा सकारात्मक वापर केला पाहिजे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप लोखंडे यांनी केले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. संमेलनाचा समारोप ‘तुका आकाशा एवढा” या संत तुकारामांच्या अभंगावर सांगीतिक कार्यक्रमाने झाला.

Leave a Reply

%d bloggers like this: