समाज माध्यमांवरील वागणूक लोकशाही’ला सुसंगत असावी – श्रीकांत देशपांडे
पुणे : “आताचा तरुण डिजिटल आणि प्रत्यक्ष अशा दोन जगांमध्ये वावरत असतो. समाज माध्यमातून विविध विषयांवर अगदी सहजपणे ते आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात. मात्र, आपले मत व्यक्त करताना अभिव्यक्ती केवळ आपल्याला आहे या अविर्भावात तरुणांनी राहू नये, दुसऱ्यांनी व्यक्त केलेल्या मतांचा आदर राखणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. समाज माध्यमांवर लोकशाही मुल्याला सुसंगत वागणूक हवी,” असे मत महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केले.
डिजिटल मीडियाप्रेमी मंडळीतर्फे आयोजित व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मिरॅकल इव्हेंटस सहआयोजित मराठी सोशल मीडिया संमेलनाच्या शेवटच्या दिवसातील पहिल्या सत्रात देशपांडे यांनी ‘लोकशाही आणि सोशल मीडिया’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी संमेलनाचे आयोजक मंगेश वाघ, समीर आठल्ये आणि प्रदीप लोखंडे उपस्थित होते.
देशपांडे म्हणाले, “समाज माध्यम हे एक क्रांतिकारी माध्यम आहे. लोकशाही सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे प्रमुख काम या माध्यमाने केले आहे. व्यवस्थेला प्रश्न विचारायचे व्यासपीठ यामुळे उपलब्ध झाले आहे. मात्र चुकीच्या, दिशाभूल करणाऱ्या माहितीच्या आधारे समाज माध्यमाचा वापर लोकशाहीच्या विरोधात जर ते वापरले जाऊ लागले तर ते घातक ठरेल. त्यामुळे समाज माध्यमांचा वापर लोकशाहीच्या विरोधात होऊ नये, याचे भान युवकांनी राखले पाहिजे.”
लोकशाहीचा मूळ आधार असलेला मताधिकाराचा वापर अत्यल्प प्रमाणात होत आहे. एक मोठा वर्ग हा मूलभूत हक्क जपण्यात सजग नाही. आपला मूलभूत हक्क जपण्यासाठी नागरिकांनी सोशल मीडियाचा वापराद्वारे जागरुकता निर्माण केली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
संमेलनात ‘सांस्कृतिक वारसा, आपण आणि सोशल मीडिया’ या विषयावरील चर्चासत्रात वारसावास्तू जतन क्षेत्रात कार्यरत असलेल्या वास्तू विशारद अर्चना देशमुख, संत साहित्याचे अभ्यासक सचिन पवार, संस्कृत विषयाचे अभ्यासक हेमंत राजोपाध्ये हे सहभागी झाले होते. प्राध्यापक योगेश बोराटे यांनी या सत्रात वक्त्यांशी संवाद साधला. गड-किल्ल्यासारख्या सांस्कृतिक वारसाचे जतन करण्यासाठी सोशल मीडियावर एक मोठी चळवळ सुरू असते. ही अतिशय सकारात्मक चळवळ आहे. समाज माध्यमातून सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी चालू असलेल्या कामाबाबत प्रसार केला जातो, चांगल्या कामांना प्रोत्साहन मिळते आणि त्याचबरोबर निधी संकलनासाठी उपयोग होतो. तरुणाई या कामासाठी झोकून देऊन काम करत आहेत. मात्र तरुणाईच्या या उत्साहाला दिशा देणाऱ्या व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे, असे मतही वक्त्यांनी यावेळी व्यक्त केले.
‘चळवळींचा मीडिया’ या विषयावर आयोजित सत्रात मानवाधिकार कार्यकर्ते अॅड. असीम सरोदे, नदी संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या परिणीता दांडेकर, दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या दीक्षा दिंडे आणि तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या शमीभा पाटील या वक्त्यांनी सहभाग नोंदवला. मानवी हक्क असो वा सामाजिक प्रश्न या सर्व मुद्द्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचा फोडली जाऊ शकते. चळवळ पुढे नेण्यासाठी ठाम भूमिका घेण्याची गरज असते आणि सोशल मीडियाद्वारे ही भूमिका सकारात्मक दिशेने मांडता येते. आजची तरुणाई सोशल मीडियाचा वापर करून या चळवळींना पुढे नेण्याचे काम करते आहे ही सकारात्मक बाब आहे. कोणताही विषय या माध्यमातून प्रभावीपणे मांडता येतो. त्यामुळे या माध्यमाचा वापर परिवर्तन घडविण्यासाठी करायला हवा असा सूर या चर्चेतून निघाला.
