पुणे शहरातील व जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटिसा
पुणे : मनसे कार्यकर्त्यांनी मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालिसा म्हणू नये म्हणून मुंबई पोलिसांनी आज मनसे कार्यकर्त्यांना नोटीस बजावली होती. मंगळवारी आज पुणे शहरातील व जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा देणे सुरू केले आहे.
दुसरीकडे औरंगाबादमधील सभेप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात मंगळवारी औरंगाबादमधील सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी औरंगाबादमध्ये झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी ४ मे रोजी मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालिसा म्हणू असे खुले आव्हान दिले होते. मशिदीवरील भोंगे उतरवले नाही तर ४ मे रोजी काहीही ऐकणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले होते. यामुळे मुंबई पोलिसांची मनसे कार्यकर्त्यांना कलम १८८ अंतर्गत नोटीस पाठवली आहे.
औरंगाबादमधील सिटी चौक पोलिस ठाण्यात राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे मनसे कार्यकर्ते चांगलेच नाराज झाले आहेत. अशातच पुणे शहरातील व जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा देणे सुरू झाले आहेत. बुधवारी मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालिसा म्हणू नका म्हणून कार्यकर्त्यांना नोटिसा देण्यात येत आहे. यामुळे बुधवारी महाआरती होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
