परीक्षा काळात पुणे विद्यापीठातील विद्यार्थिनी वसतिगृहात पाणी संकट; अभाविपचा आंदोलनाचा इशारा 

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थिनी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींना पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. ‘Oxford of the East’म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विद्यापीठात मुलींना वसतिगृहात वापरासाठी पाणी नाही ही आश्चर्याची बाब आहे.

मागील काही दिवसांपासून पुण्यात अनेक भागात पाण्याची टंचाई या वर्षी जाणवली आहे. त्याचा परिणाम विद्यापीठातील वसतिगृहातील पाण्याच्या उपलब्धतेवर सुद्धा झाला आहे. विद्यापीठात विद्यार्थिनीचे १० वसतिगृह असून मागील १ महिन्यापासून पाण्याचा हा प्रश्न या वसतिगृह मध्ये सुरू आहे. मागील वेळी अभाविप कडून आंदोलन व पाठपुरावा केल्यामुळे काही वसतिगृहातील पाण्याची टंचाई दूर झाली मात्र त्यातही अनेक वेळा अनियमितता सुरू असते. यामध्ये वसतिगृह क्र. १० मध्ये मात्र मागील ७ दिवसांपासून पाण्याची अडचण असून ऐन परीक्षेच्या काळात ही समस्या निर्माण झाल्यामुळे विद्यार्थिनींना या समस्येचा अधिक त्रास होत आहे.

वसतिगृह प्रमुख प्रा. बल्लाळ सर, देशपांडे मॅडम यांना वारंवार या विषयात अभाविप कडून निवेदन देण्यात आले मात्र प्रशासनाकडून अजूनही हा प्रश्न सुटला नाही. जागतिक दर्जाचे विद्यार्थी विद्यापीठात शिक्षण घेतात मात्र त्यांना विद्यापीठ प्रशासनाकडून पाणी सुद्धा उपलब्ध केले जात नाही ही बाब अतिशय शरमेची आहे. आज अभाविप कडून विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल्ल पवार यांना निवेदन देऊन तत्काळ हा प्रश्न सोडवावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा अभाविप कडून प्रशासनाला देण्यात आला आहे. यावेळी वसतिगृहातील विद्यार्थिनी व अभाविप कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: