गायक जितेंद्र भुरुक यांचा सन्मानार्थ विशेष टपाल तिकीट

पुणे : पुण्यातील गायक जितेंद्र भुरुक यांनी किशोर कुमार यांची ८९ गाणी सलग ११ तास गाऊन आणि एकाच दिवशी ५ वेगवेगळ्या सभागृहांमध्ये १३५ गाणी सादर करून विश्वविक्रम केल्याच्या कामगिरीची दखल घेत टपाल खात्यातर्फे एक विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आले आहे. काल दिनांक १ मे रोजी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य समारंभात प्रसिद्ध सिने अभिनेते जितेंद्र यांच्या हस्ते सदर तिकिटाचे अनावरण करण्यात आले. यावेळी भुरुक यांना वर्ल्ड रेकॉर्ड इंडियातर्फे मानपत्र आणि पदक प्रदान करण्यात आले व सत्कार समितीतर्फे त्यांचा शिंदेशाही पगडी आणि शेला देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी संगीतकार इनोक डॅनिअल, अभिनेता स्वप्नील जोशी, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी उपमहापौर दीपक मानकर, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील, गिनीज फाउंडेशनचे अध्यक्ष पवन सोळंकी, तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, अभिनेता दिग्दर्शक प्रवीण तरडे, समाजसेविका शोभा धारीवाल, सचिन इटकर, सचिन नाईक, मनिष साबडे आदी उपस्थित होते.

भूरूक यांनी गायलेली गाणी मी ऐकली आहेत, त्यांचा आवाज अद्भूत आहे. माझ्या मुंबईच्या निवासस्थानी भूरूक आले असताना त्यांनी काही गाणी गाऊन दाखवली. मी त्यांचा आवाज ऐकून अचंबित झालो. त्यांचे नशीब किशोर कुमारांसारखे नसले तरीही आवाज मात्र त्यांच्यासारखा आहे, अशा भावना ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी व्यक्त केल्या.

गिनीज फाउंडेशनचे सोळंकी या रेकॉर्ड बद्दल माहिती देताना म्हणाले, आतापर्यंत आमच्याकडे तीन हजारांहून अधिक रेकॉर्डची नोंद झालेली आहे. मात्र लाइव्ह बँडसह गाण्यांचा रेकॉर्ड करण्याचा हा पहिलाच प्रयोग होता. पंडित सुरेश तळवलकर म्हणाले, कलेतून भावना पर्यंत पोहोचता येते. कला ही प्रत्येकाच्या मनावर राज्य करते आणि जितेंद्र भुरुक आपल्या कलेतून हेच काम करीत आहे.

आपल्या भावना व्यक्त करताना जितेंद्र भुरुक म्हणाले, गाणे हा माझा श्वास आहे. किशोरदांची गाणी न गाता जगणे माझ्यासाठी कठीण आहे. या रेकॉर्डसाठी माझे सहकारी, मित्र, वाद्यवृंद, आर्टिस्ट या सगळ्यांचा पाठिंबा मिळाला आणि त्यांचामुळेच हे शक्य झाले.

Leave a Reply

%d bloggers like this: