Sunday, July 26, 2026
Latest NewsPUNE

गळके व निकृष्ट पाणी टँकर गाड्यांवर कारवाई करावी : आपची मागणी

लोकांना चिरडणाऱ्या बेदरकार टँकर चालक, दुर्लक्ष करणाऱ्या वाहतूक अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा

पुणे : गेल्या १० दिवसात पुणे शहरात टँकरखाली चिरडून दोन वेगवेगळ्या अपघातात दोन नागरिकांचा बळी गेला आहे. गळके व निकृष्ट पाणी टँकर गाड्यांवर कारवाई करावी तसेच लोकांना चिरडणाऱ्या बेदरकार टँकर चालक, दुर्लक्ष करणाऱ्या वाहतूक अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशा मागण्या करणारे निवेदन आज आम आदमी पक्षातर्फे पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना आज दिले.

टँकरमधून रस्त्यावर होणारी पाणी गळती व पाणी टँकर फिटनेस प्रमाणपत्र नसणे ह्या विषयांवर अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. फिटनेस प्रमाणपत्र देण्या अगोदर ह्या वाहनांना वैध मापन विभागाकडून पाणी वाहण्यासाठी क्षमता प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे, ह्या बाबींचा उल्लेख निवेदनात केला आहे. आप महाराष्ट्र वाहतूक विंग अध्यक्ष श्रीकांत आचार्य, आप पुणे शहर संघटक एकनाथ ढोले, आम आदमी पक्षाचे आनंद अंकुश यांनी हे निवेदन दिले.

पेट्रोल, डिझेल, गॅस यांचे टँकर कधीही गळके नसतात. दुधाचे टँकर गळते नसतात… तर मग पाण्याचे गळके टँकर एवढ्या मोठ्या संख्येने पुणे शहरांमध्ये राजरोसपणे कसे वावरत आहेत ? याबाबत वाहतूक प्रशासन काहीच कारवाई का करत नाही? अमूल्य ठेवा असलेल्या पाण्याची अशा पद्धतीने नासाडी करणे योग्य नाही. तरी या बाबत वाहतूक प्रशासनाने तातडीने निकृष्ट गळत्या टँकरवर कारवाई करावी.

गेल्या दहा दिवसात टँकरखाली दोन लोक चिरडले गेले आहेत. तरीही प्रशासन आपल्या कुंभकर्णी झोपेतून जागे व्हायला तयार नाही. या सबंधित टँकर चालकावर व कर्तव्य कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आम आदमी पक्षाची आहे. तसेच टँकरच्या टाकीच्या आत द्रव्य गतिरोधक सुस्थितीत आहेत की नाही ह्याची तपासणी करून फिटनेस प्रमाणपत्र द्यावे ही आम आदमी पार्टीने विनंती केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading