चित्रपट सृष्टीत काम करताना स्वतः साठी चौकट आखून घेतली की काम करणे सोपे – अभिनेत्री मृणाल कुलकर्णी
पुणे : चित्रपट सृष्टीत काम करताना आपण स्वतः साठी एक चौकट आखून घेतली की काम करणे सोपे होते असे मत प्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका आणि दिग्दर्शक मृणाल कुलकर्णी यांनी व्यक्त केले. रिसर्च सोसायटी फॉर स्टडी ऑफ डायबेटिस इन इंडिया तर्फे आयोजित ‘१६ व्या महाआरऐसऐसआयडीआय’ या मधुमेह तज्ञांच्या राज्यस्तरीय वार्षिक परिषदेत कुलकर्णी यांची मुलाखत दिग्दर्शक किरण यज्ञोपवित यांनी घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
कारगिल युद्धात मोलाची कामगिरी बजावणारे कर्नल ललित राय, डॉ. शैलजा काळे, डॉ. शशांक जोशी, डॉ. संजय अगरवाल, डॉ. राजीव कोविल, डॉ नारायण देवगावकर आणि डॉ. दिलीप काळे आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. सदर परिषदेत डॉ. शशांक जोशी यांच्याकडून रिसर्च सोसायटी फॉर स्टडी ऑफ डायबेटिस इन इंडिया महाराष्ट्र चॅप्टरच्या अध्यक्षपदाची सूत्रे डॉ. शैलजा काळे यांनी स्वीकारली.
मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, अभिनय करताना मी अनेक गोष्टींना नाही म्हणाले आणि ज्या गोष्ठी मला करायच्या होत्या त्या मी माझ्या चौकटीत राहून साध्य केल्या. मला माझ्या कुटुंबासोबत बसून माझे काम बघता आले पाहिजे अशाच प्रकारचे काम करत त्यात विविधता आणण्याचा प्रयत्न मी केला.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “माझ्या मनात असलेल्या विषयांवर चित्रपट येत नव्हते याची खंत मनात होती आणि त्यामुळेच मला दिग्दर्शनाकडे वळावेसे वाटले. छत्रपती शिवाजी महाराजांवर गेल्या काही वर्षात आलेले मराठी चित्रपट आणि काश्मीर फाइल्स सारख्या चित्रपटांना मिळालेला प्रतिसाद बघता तरुण पिढीला आपल्या इतिहासात काय घडले हे जाणून गेण्याची इच्छा आहे ही बाब निदर्शनास आली. त्यामुळे इतिहास प्रेक्षकांसमोर योग्य पद्धतीने उलगडून दाखवणे गरजेचे आहे”
कारगिल युद्धात मोलाची कामगिरी करणारे कर्नल ललित राय यांनी यावेळी उपस्थित मधुमेहतज्ञांच्या समोर भाषण करत भारतीय सेनेच्या अतुलनीय पराक्रमाच्या आठवणी जागवल्या. ते म्हणाले, कठीण परीस्थितच सैन्यदल आणि वैद्यकीय सेवा यांच्या कामाची दखल घेत त्यांचे कौतुक केले जाते. वैद्यकीय क्षेत्रात संशोधनाला अनन्यसाधारण महत्व असल्याचे सांगत रिसर्च सोसायटी फॉर स्टडी ऑफ डायबेटिस इन इंडियाच्या कामाचे त्यांनी कौतुक केले. “डॉक्टर तुम्ही पांढरा कोट घालून रुग्णांची सेवा करता. पांढरा रंग विश्वासाचे’ प्रतिक आहे तुमच्यावर जे उपचारासाठी विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीच आम्ही लढतो”, असे राय म्हणाले.
