सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘सूक्ष्मपुराजैवकी प्रस्तरविज्ञान’ (ICMS -2022) विषयावर तीन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील परिषद
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पर्यावरणशास्त्र विभागाच्या सहकार्याने राष्ट्रीय स्तरावरील ‘सूक्ष्मपुराजैवकी प्रस्तरविज्ञान’ विषयावर ४ ते ६ मे दरम्यान तीन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत संपूर्ण भारतातून विविध संस्था, विद्यापीठांमधील अनुभवी ज्येष्ठ वैज्ञानिक आपले शोधनिबंध सादर करतील, तसेच व्याख्याने व चर्चासत्रेही होतील.
या परिषदेची सुरुवात ४ मे रोजी सकाळी नऊ वाजता संत नामदेव सभागृहात होणार असून ओएनजीसी कार्यकारी संचालक व बसिन मॅनेजर- वेस्टर्न ऑफशोर बसिनचे व्ही.जे.पांडे, सीएसआयआर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशोनोग्राफी गोवाचे माजी उपसंचालक डॉ. राजीव निगम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र.कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुरेश गोसावी यांची उपस्थिती असणार आहे.
याविषयी अधिक माहिती देताना परिषदेच्या निमंत्रक आणि पर्यावरणशास्त्र विभागाच्या सहायक प्राध्यापिका डॉ.रजनी पंचांग यांनी सांगितले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात ही तीन दिवसीय २८ वी परिषद भरणार आहे. याची पहिली परिषद १९७१ साली बंगळुरू विद्यापीठात भरविण्यात आली होती. या परिषदेला पन्नास वर्षे पूर्ण झाली असून तब्बल चाळीस वर्षानंतर ही परिषद पुण्यात भरविण्यात येणार आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशोनोग्राफी गोवा, नॅशनल सेन्टर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च गोवा, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, बिरबल सहानी इन्स्टिट्यूट ऑफ पलेओ सायन्सेस लखनौ, वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिओलॉजी डेहराडून आणि देशभरातील अनेक नामांकित संस्थांमधील दिगग्ज या परिषदेत सहभागी होणार आहेत. तसेच या परिषदेत तरुण अभ्यासकांचाही सहभाग असणार आहे. यादरम्यान काही पोस्टर प्रदर्शनही भरविण्यात येईल.
या परिषदेत साधारण २५० अभ्यासक असणार असून ही केवळ नोंदणीधारकानाच येथे प्रवेश असणार आहे.
नागरिकांना व्याख्यानांची पर्वणी.!
ही एकूणच परिषद नोंदणीधारकांसाठी असली तरीही उद्घाटन कार्यक्रम व डॉ. राजीव निगम यांचे ५ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता संत नामदेव सभागृहात ‘द्वारका, रामसेतू, महाबलीपुरम.. भारतीय पौराणिक कथा की इतिहास’ या विषयावर होणारे व्याख्यान हे सर्वांसाठी खुले असणार आहे.