”संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत राष्ट्र सेवा दलाचा मोठा वाटा !” -निलेश निंबाळकर

पुणे : स्वतंत्र भारतात मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक व राजकीय या सर्व अंगानी कसा उभा राहिला? व संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेतील राष्ट्र सेवा दलाची वाटचाल याबद्दल राष्ट्र सेवा दलाचे पूर्णवेळ कार्यकर्ते निलेश निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच, “15 ऑगस्ट 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळाले. मात्र, महाराष्ट्र स्वतंत्र नव्हता! भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता. पुढे हळूहळू देशातील राज्य भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर वेगळी झाली. त्यानुसार 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सेवा दलाचे पहिले दलप्रमुख एस. एम. जोशी यांनी अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडली. संयुक्त महाराष्ट्र समितीचे सचिव असतांना देशातील इतर समित्यांसमोर महाराष्ट्राची भूमिका मांडणे, त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक चळवळीतील पुढाऱ्यांना एकत्र घेऊन संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा उभारण्याचे काम एस. एम. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर झाले आणि यामध्ये सेवा दलाच्या अनेक साथींनी सहभाग नोंदवला व बलिदानही दिले त्या दृष्टीने राष्ट्र सेवा दलाचा मोठा वाटा संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये आहे.” असेही ते यावेळी म्हणाले.

राष्ट्र सेवा दलाच्या शहिद स्तंभाच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात धडपडणाऱ्या तरुणाईने चळवळीतील गाणी म्हणत केली. यावेळी राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष कबीर पळशीकर, छात्रभारती जिल्हाध्यक्ष छाया काविरे, अमोल आरोटे, शिबा गायकवाड, शंतनू कोटकर, रवी लामखेडे, राधिका मुळे, सानिका केळकर, क्रांती आपटे, सौगंध, शुभम, सागर कोल्हाळ, विश्वास राशिवाडे , ताई दौंडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: