कला संस्कारीतच केली जाते – पद्मश्री पं. सुरेश तळवलकर

पुणे : भारतात गुरू शिष्य परंपरेला दीर्घ इतिहास आहे. मात्र, कोणतीही कला ही शिकून येत नाही, तर ती संस्कारीत व्हावी लागते. शास्त्र समजावून सांगितले जाते, विद्या दिली जाते पण कला ही संस्कारीतच केली जाते असे मत ज्येष्ठ तबलावादक तालयोगी पद्मश्री पं. सुरेश तळवलकर यांनी व्यक्त केले.

आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्त आज पायलवृंद संस्था आणि कोहिनूर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार भवन येथे पुण्यातील ज्येष्ठ नृत्यगुरु मनीषा साठे, नृत्यगुरु डाॅ. नंदकिशोर कपोते आणि ज्येष्ठ नृत्यगुरु शमा भाटे या नृत्यगुरुंना पहिला पद्मविभूषण पं. बिरजू महाराज नृत्याचार्य पुरस्कार पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कोहिनूर ग्रुपचे संचालक कृष्णकुमार गोयल, पायलवृंदच्या संचालिका निकीत मोघे आणि संवाद, पुणेचे सुनील महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पं.सुरेश तळवलकर म्हणाले की, ज्यावेळी गुरू एखादी गोष्ट गिरवून घेतो, ठसवून सांगतो त्यावेळेस प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रित्या संस्करणाची ही प्रक्रीया घडत असते. ‘महाराजां’कडून संस्कारीत होत आलेली ही नृत्य परंपरा आजच्या पुरस्कारार्थींनी पुढेे सुरू ठेवली असल्याने त्यांना आज मिळालेला पुरस्कार म्हणजे त्यांना मिळालेल्या संस्करणाचा परिपाक आणि परिणाम आहेे.

नृत्यगुरु डाॅ. नंदकिशोर कपोते म्हणाले की, कथक परंपरेचा उत्तम वारसा लाभलेला असतांनाही महाराजांनी आपली स्वतःची शैली विकसीत केली. महाराज घराणे पद्धती मानत नव्हते. ज्याच्या ज्याच्या कडे जे जेे चांगले ते ते आपण टिपून घ्यायला हवे, आत्मसात करायला हवे अशी त्यांची मनोधारणा होती. आज कथक नृत्यात जी जी घराणी आहेत त्या प्रत्येक घराण्यातून तयार होण-या नृत्य कलाकारामध्ये महाराजांची झलक आपल्याला आढळून येतेे.

ज्येष्ठ नृत्यगुरु मनीषा साठे म्हणाल्या की, मी महाराजांची थेट शिष्या नसतानाही नृत्य परंपरेत मी त्यांनी आदर्श मानले आहे. त्यांचा आदर्श ठेेवला आहे. महाराजांनी जाता-येेता या क्षेत्रात मांडलेल्या तत्वज्ञानाचे आपण ज्यावेळी चिंतन करतो त्यावेळेस थोडेेफार काहीतरी सापडल्यासारखे वाटतेे.

ज्येष्ठ नृत्यगुरु शमा भाटे म्हणाल्या की, आज वयाच्या 72 व्या वर्षी ही महाराजांसारखे नृत्य मला येत नाही. परमेश्वराने एकच बिरजू महाराज घडविल्याची माझी ठाम खात्री आहेे. कलाकारांचे कलाकार आणि नर्तकांचे नर्तक असे महाराजांचे थोडक्यात वर्णन करता येईल.

 

Leave a Reply

%d bloggers like this: