व्यवस्था पर्यावरणाप्रती असंवेदनशील – अ‍ॅड. असीम सरोदे

पुणे: “नदी, पर्वत, जंगल अशी पर्यावरणासंदर्भातील प्रकरणे चालवताना न्यायालयात याचिकाकर्त्याची व प्रतिवादींची बाजू ऐकली जाते पण यामध्ये एक अदृश्य व्यक्ती असते तिचे म्हणणे हरित न्यायाधिकरणाने ऐकणे सगळ्यात जास्त गरजेचे असते व ती व्यक्ती म्हणजे पर्यावरण आहे. निसर्गाबाबतच्या प्रत्येक प्रकरणात ‘पर्यावरण’ अन्यायग्रस्त असते. परंतु पर्यावरण विषयावर काम करताना व्यवस्थेची पर्यावरणाप्रती असणारी असंवेदनशीलता अनेकदा पहायला मिळते. ‘हायपर टेक्निकल’ म्हणजेच प्रक्रीयावादी असणारे न्यायाधीश पर्यावरणासंदर्भात योग्य पद्धतीने न्यायनिर्णय देऊ शकत नाहीत अशी खंत अ‍ॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केली.

पुण्यातील कृषि महाविद्यालय येथे वनराई आणि जल बिरादरी आयोजित ‘नदी की पाठशाळा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, जल साक्षरता केंद्राचे सेवा निवृत्त कार्यकारी संचालक डॉ. सुमंत पांडे, जलबिरादरीचे नरेंद्र चुग, डॉ. प्रमोद मोघे, श्रीमती शैलजा देशपांडे, अ‍ॅड. तृणाल टोणपे, ऋषिकेश शिंदे, डॉ. एस एच पाटील (अध्यक्ष राज्य जैव विविधता मंडळ), डॉ. रुपाली पाटील व डॉ. प्रीती आफळे इत्यादी यावेळी उपस्थित होते.

नद्या व पर्यावरण यांचे रक्षण करण्यासाठी विद्यार्थी व सामान्य नागरिकांनी माहिती अधिकाराचा वापर केला पाहिजे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पाटबंधारे-जलसंपदा विभाग अश्या महत्वाच्या शासकीय यंत्रणांना सक्रीय करण्याची गरज आहे. कुठलेही शासकीय कार्यालय हे जनतेसाठी खुले असते आणि तेथे प्रवेश करण्यास कोणीही मज्जाव करू शकत नाही, सामान्य माणसांचे शासकीय कार्यालयात जाणे-येणे वाढल्यास त्यांच्या कामात पारदर्शकता येईल. सामान्य माणसांनी पर्यावरण रक्षणासाठी केसेस दाखल कराव्यात व स्वतःच चालवाव्यात त्यासाठी वकील नियुक्त करण्याची गरज नाही असेही अ‍ॅड. असीम सरोदे म्हणाले.

रविंद्र धारिया म्हणाले की, जलचक्रामध्ये नदी व भूजलाचा परस्पर संबंध आहे तो आपण लक्षात घेत नाही. भूजलाचा उपसा करताना नदीवर काय परिणाम होतो याची चिंता केली जात नाही. पाण्याची बचत, त्याचा योग्य वापर, अपव्यय व प्रदूषण टाळणे या सर्वांसाठी पाण्याचे व्यवस्थापन समर्थ असले पाहिजे. ‘भविष्यातील पाणी संकटातून मार्ग काढण्यासाठी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक बनले आहे. त्याचबरोबर पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब अडविण्याचा एकत्रित प्रयत्न करण्याची आपली जबाबदारी आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उद्देशाने वनराईने २०१४ पूर्वीच कृषी महाविद्यालयामध्ये पाणलोट क्षेत्रासंबंधी प्रात्याक्षिके विद्यार्थ्यांना अभ्यासाच्यादृष्टीने उपलब्ध करुन दिली आहे. शेती व मानवी जीवनात पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पाणी बचत व जलसंवर्धन करण्याच्या कामात समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे.

नदीविषयी विद्यार्थ्यांमध्ये सामजिक जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने हा ‘‘नदी की पाठशाळा’ या अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक दृष्ट्या आणि पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून महत्वाच्या असणाऱ्या विषयावर काम करत असताना येणाऱ्या अडचणी आणि त्या अडचणींचे असणारे संभाव्य उत्तरे या सगळ्या बाबत विद्यार्थ्यांना वक्त्यांकडून सविस्तर मार्गदशन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सामजिक विषयांवर भूमिका घेण्याची वृत्ती निर्माण होऊन जबाबदारी निर्माण व्हावी हे या कार्याक्रमचे उद्दिष्ट होते असे डॉ सुमंत पांडे म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: