पुणे मनपासमोरील हिरवळीवर जाण्यास नागरिकांना मनाई करणारे आदेश मागे घ्यावेत : विजय कुंभार

पुणे: महानगरपालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोर हिरवळीवर जाण्यास, बाकड्यावर बसण्यास नागरिकांना महानगरपालिकेचे सुरक्षारक्षक मनाई करत आहेत असे आम आदमी पक्षाच्या निदर्शनास आले आहे.

याबाबत माहिती घेतली असता असे समजले की अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांच्या आदेशावरून महापालिकेच्या आवारात नागरिकांना बसण्यास व हिरवळीवर जाण्यास मनाई केली आहे. पुतळ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पोलिसांनी उपस्थित केल्यामुळे सदर निर्णय घेतल्याची माहिती मनपाच्या सुरक्षा विभाग प्रमुख माधव जगताप यांनी आम आदमी पक्षाला दिली.

पुणे महानगरपालिकेमध्ये दररोज मोठ्या संख्येने सामान्य नागरिक त्यांची प्रशासकीय कामे घेऊन येत असतात. अनेकदा मनपाचे अधिकारी अनेकदा जागेवर उपस्थित नसतात, वेळेवर कामाला येत नाहीत, जेवणाची सुट्टी लवकर संपत नाही. अशा वेळी नागरिकांनी कुठे जायचंय असा प्रश्न तयार होतो. अनेकदा अधिकारी हे प्रशासकीय बैठकांना गेलेले असतात किंवा तसे नागरिकांना सांगितले तरी जाते. महापालिकेमध्ये अशा नागरिकांसाठी वेटिंग रूम किंवा बसण्याची वेगळी व्यवस्था प्रत्येक विभाग निहाय नसल्यामुळे अशावेळी महानगरपालिकेच्या प्रांगणातील हिरवळीवर बसून अथवा बाकड्यावर बसून वाट पाहण्याशिवाय सर्वसामान्य नागरिकांना गत्यंतर नसते. ती सुद्धा व्यवस्था आता महानगरपालिकेने बंद केल्याने नागरिकांची मोठी कोंडी झाली आहे. महानगरपालिका हे काही प्रेक्षणीय अथवा पर्यटन स्थळ नसून ती नागरिकांची गरज आहे. महानगरपालिका ही नागरिकांच्या हक्काची प्रशासकीय संस्था आहे. मनपाने नेमलेल्या कार्यालयातून वेळेत सर्व नागरिकांची कामे पूर्ण झाली असती तर नागरिकांना महानगरपालिकेच्या इमारतीचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली नसती. परंतु नागरिकांच्या या व्यथा समजून घेण्यामध्ये मनपा प्रशासन कमी पडत आहे. त्यामुळे असले चुकीचे निर्णय घेतले जातात.

वास्तविक पाहता महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा कित्येक वर्षे महानगरपालिकेच्या प्रांगणात असून देखील आणि लोकांचा दररोज मोठ्या संख्येने महानगरपालिकेच्या प्रांगणात, पुतळ्याच्या आजूबाजूला, हिरवळीवर, बाकड्यावर वावर असून देखील कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सर्वांनाच उत्कट प्रेम, आदर भाव आहे.


“पुतळ्यांची सुरक्षितता ही सुरक्षा विभागाची जबाबदारी असली तरी त्यासाठी नागरिकांना वेठीस धरण्याची भूमिका योग्य नाही. मनपा प्रांगणातील बाकड्यावर, हिरवळीवर नागरिकांना बसण्यासाठी केलेली मनाई तातडीने मागे घेण्यात यावी”, अशी मागणी आप राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी केली.

Leave a Reply

%d bloggers like this: