सामुहिक कलाविष्कार चित्र प्रदर्शनास उस्फूर्त प्रतिसाद
पुणे : स्प्लॅक्ट-२२ ह्या रोमार्टिकातर्फे सामुहिक कलाविष्कार चित्र प्रदर्शनातील चौथे पुष्प नुकतेच पार पडले. कोरेगाव पार्क पुणे येथे मलाईका स्पाईस कलादालनात या चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन चिरंजीव रेस्टॉरंट अँड प्रा.लि. चे संस्थापक व मॅनेजिंग डायरेक्टर प्रफुल चंदावरकर यांच्या हस्ते झाले. स्प्लॅक्ट-२२ ह्या रोमार्टिकातर्फे आयोजित या चारही सामुहिक कलाविष्कारास रसिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
या चौथ्या सामुहिक कलाविष्कार चित्र प्रदर्शनात चित्रकार कविता तांबोळकर, निकिता महाले, नीलांजना रॉय, सोनजाई मौर्य, अर्चना गोरिंटाला यांची चित्रे ठेवण्यात आली होती. यामध्ये कविता तांबोळकरच्या अनोख्या रंगसंगतीतील चित्रांमध्ये सर्वांना भारतीय क्लासिक कलेची वैशिष्ट्ये पाहून एक वेगळी अनुभूती लाभली. निकिता महालेच्या अमूर्त चित्रांमध्ये गडद पार्श्वभूमीवर पांढऱ्या रंगसंगतीतून साकारलेली एक वैशिष्ट्यपूर्ण कलाकृतीचे दर्शन घडले. नीलांजना रॉयच्या अभूतपूर्व व्यक्ती चित्रांमधून सर्वांना एक वेगळाच अनुभव मिळाला. सोनजाई मौर्य यांच्या बुद्धाच्या भावमुद्रेतील वैश्विक व योग्य आध्यात्मिक भाव सर्वांच्या मनावर एक वेगळाच परिणाम साधत होते. अर्चना गोरिंटालाच्या फोटोरिॲलिझम शैलीत चित्रे सर्वांना एक अनोखा आनंद देण्याचा सफल झालीत. तसेच या प्रदर्शनात रोमार्टिका तर्फे २०२२ च्या कलास्पर्धेतील बक्षीस विजेता चित्रकार केखरी नैखा ह्याचे मृत्तिकाचित्र (मातीपासून व चिखलातून साकारलेले) ठेवण्यात आले होते. ते सगळ्यांना आवडले.
