काळभैरवनाथ, राजे उमाजी नाईक, पर्व स्पोर्ट्स मुख्य फेरीत

 

हिंदूहृदसम्राट चषक जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा : महिला गटात सुवर्णयुग, जागृती प्रतिष्ठानची आगेकूच

पुणे : काळभैरवनाथ, राजे उमाजी नाईक, पर्व स्पोर्ट्स संघांनी पूना अँमच्युअर्स कब्बडी संघटना, शिवसेना कसबा यांच्या वतीने हिंदूहृदसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने ४८ व्या कुमार – कुमारी गटाच्या हिंदूहृदयसम्राट चषक जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला. तर महिला गटाच्या लढतींमध्ये सुवर्णयुग, जागृती प्रतिष्ठान संघांनी विजयी आगेकूच केली.

नेहरू स्टेडियम येथे सुरू असलेल्या स्पर्धेत मुलींच्या गटात सुवर्णयुग संघाने श्रीराम प्रतिष्ठान संघाला ४८-२ असे एकतर्फी पराभूत केले. सुवर्णयुग संघाने प्रतीक्षा केसरे, सिद्धी बलकवडे, वैभवी तापकीर व अपूर्वा ढमाले यांच्या जबरदस्त खेळाच्या जोरावर मध्यातराला ३४-१ अशी तब्बल ३३ गुणांची आघाडी घेतली. पराभूत संघाकडून अमृता सपकाळने लढत देण्याचा प्रयत्न केला.

मुलींच्या गटाच्या लढतीमध्ये जागृती प्रतिष्ठान संघाने लोणकर माध्यमिक विद्यालय संघाला ४४-१२ असे ३२ गुणांनी पराभूत केले. जागृती संघाने २०-६ अशी मध्यांतराला आघाडी घेतली. जागृती संघाकडून तन्वी लोहार, साक्षी मसुरकर, कृतीका तळेकर व रक्षा पवार यांनी सुरेख पकडी व चढाया करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. समीक्षा पटेकर व श्रावणी बोराडे यांनी लढत देण्याचा प्रयत्न केला.

मुलांच्या गटात काळभैरवनाथ कबड्डी, रहाटणी संघाने वाघेश्र्वर कबड्डी संघ चऱ्होली संघाला ३५-१५ असे २० गुणांनी पराभूत केले. मध्यांतराला काळभैरवनाथ संघाने १६-६ अशी १० गुणांची आघाडी घेतली होती. विजयी संघाकडून आर्यन राठोड, संकेत फुंदे, महेश शिरसाठ यांनी तर पराभूत संघाकडून विजय पठारे, जयेश गायकवाड यांनी सुरेख खेळाचे प्रदर्शन केले.

राजे उमाजी नाईक संघाने एसओपीएस, धायरी संघाला २०-१४ असे ६ गुणांनी पराभूत केले. ओम दिघे, अभिषेक मोकाशी व प्रथमेश पंडित यांच्या सुरेख खेळाच्या जोरावर नाईक संघाने मध्यांतराला १०-३ अशी ७ गुणांची आघाडी घेतली. एसओपीएस संघाकडून नवनाथ पाटील व शिवम यादव यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.

अटीतटीच्या झालेल्या लढतीमध्ये पर्व स्पोर्ट्स संघाने बारामती अजिंक्य संघाला २५-२१ असे केवळ ४ गुणांनी पराभूत केले. प्रशांत ओव्हाळ, आदेश काळे व सुयश पिसाळ यांनी विजयी संघाकडून तर सूरज कुंभारकर व संकेत खाडे यांनी पराभूत संघाकडून सुरेख खेळ केला.

Leave a Reply

%d bloggers like this: