डिझाईन व कल्पकतेमध्ये ‘स्टोरी टेलिंग’ असणे महत्वाचे -आशिष कुलकर्णी

पुणे : जगातील इतर देशांमध्ये माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्र सर्वात पुढे आहे. भारताला १०७ वर्षांचा चित्रपटांचा मोठा इतिहास आणि या क्षेत्रातील गाढा अनुभव असूनही देशाच्या जीडीपी ला याद्वारे सहाय्य मिळताना दिसत नाही. आपण केवळ आपल्यापुरते या क्षेत्राकडे पाहतो. तसे न पाहता जागतिक पातळीवर माध्यमे, मनोरंजन, अ‍ॅनिमेशन, डिझाईन क्षेत्राला पहायला हवे. त्याकरीता डिझाईन व कल्पकता यामध्ये स्टोरी टेलिंग असणे अत्यंत महत्वाचे आहे, असे मत भारत सरकारच्या अ‍ॅनिमेशन डिझाईन टास्कफोर्सचे सल्लागार सदस्य आशिष कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

औद्योगिक युगातला डिझाईन उद्योग आणि डिझाईनच्या अनेक पैलूंविषयी माहिती देणा-या ‘ डिझाईनगिरी ‘ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. सृजन कॉलेज आॅफ डिझाईनचे कार्यकारी संचालक संतोष रासकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. कार्यक्रमाला माजी खासदार प्रदीप रावत, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी मान्यवर उपस्थित होते.

आशिष कुलकर्णी म्हणाले, गुगल, नेटफिल्क्स हे आज प्रत्येक लहान मुलाचे आजी-आजोबा झाले आहेत. त्यामुळे त्यावर आपल्या स्टोरी असणे गरजचे आहे. स्टॉरी टेलिंग ही एक वेगळी इंडस्ट्री आहे. कल्पकता म्हणजे फक्त पेटिंग, नृत्य इतके मर्यादित नाही. तर आपण काय दृष्टीने विचार करतो, त्याला कल्पकता आणि डिझाईनमध्ये महत्त्व आहे. डिझाईनविषयी विचार करायला लावणारे कल्पक उपक्रम शालेय जीवनापासून असायला हवे, तर मुलांना या गोष्टी लहान वयापासून समजू शकतील.

प्रदीप रावत म्हणाले, ज्ञानाची कक्षा डिझाईन इंडस्ट्रीमध्ये महत्वाची आहे. एकेकाळी शैक्षणिक धोरण ठरविणा-यांकडून याकडे दुर्लक्ष झाले. आता या क्षेत्राला आदर दिला जात आहे. अनुभवी लोक ज्ञान पुढे नेतात, हा गैरसमज आहे. कारण ते केवळ चाकोरीमधून जातात. त्यामुळे अनुभवाप्रमाणेच नवीन विचार व कल्पकता देखील महत्वाची आहे.

लेखक संतोष रासकर म्हणाले, अर्थसंकल्पीय अधिवेशनात अ‍ॅनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट गेमिंग  या उद्योगासाठी टास्क फोर्स स्थापन करण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होणार असल्याचे स्पष्ट दिसते. या पार्श्वभूमीवर त्यातील तंत्रज्ञान आणि कौशल्याविषयी सामान्य माणसाला सविस्तर माहिती मिळावी यासाठी पुस्तकाची निर्मिती करण्यात आली. औद्योगिक युगातला डिझाईन उद्योग डिझाईनच्या अनेक पैलूंविषयी माहिती पुस्तकात देण्यात आली आहे. चांगल्या ग्राफिक्सच्या माध्यमातून पुस्तकात सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, असेही त्यांनी सांगितले. क्रिशा झगडे यांनी सूत्रसंचालन केले. संतोष जाधव यांनी स्वागत केले. सचिन वाघमारे यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: