तुमचा आमचा भोंगा हा नेहमीच सत्याचा भोंगा असेल – श्रीपाल सबनीस

पुणे: सध्या सर्वत्र भोंग्याचं राजकारण सुरू असलं तरी तुमचा आमचा भोंगा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावर चालणारा सत्याचा भोंगा आहे. सत्याचं राजकारण आहे, सत्याचं समाजकारण आणि अर्थकारण आहे, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, अमेरिकेतील प्राध्यापक केविन ब्राऊन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीजचे विभागप्रमुख डॉ. विजय खरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी केविन ब्राऊन यांनी ‘आफ्रिकन आणि अमेरिकन संघर्षात भारताची अधिनता’ या विषयावर सविस्तर आपले विचार व्यक्त केले.

यावेळी सबनीस म्हणाले, डॉ. खरे यांनी सुरू केलेल्या या पुरस्कारामुळे बाबासाहेबांचे विचार सर्वत्र पोहोचण्यास मदत होईल.

यावेळी केविन ब्राऊन म्हणाले, आफ्रिकन अमेरिकन लोकांनी दलितांवर होणाऱ्या अन्यायाचा विरोध तेवढ्या प्रमाणात केला नाही जेवढा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. बाबासाहेबांनी लोकशाही मार्गाने या अन्यायाविरुद्ध लढा दिला ज्याची नोंद जागतिक पातळीवर घेण्यात आली. बाबासाहेबांचे काम एकूणच मानवी जातीवर होणाऱ्या अन्यायाविरोधातील व्यापक स्वरूपाचे होते.

यावेळी सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी’ या डॉ. योगीराज बागुल यांच्या ग्रंथाला प्रदान करण्यात आला. त्यासोबत तीन उत्तेजनार्थ पुरस्कारांमध्ये डॉ. सोमनाथ कदम यांचा ‘आंबेडकरी चळवळीतील मातंग समाज’ , तुकाराम रोंगटे यांचा ‘आदिवासींचेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ आणि डॉ. विलास आढाव यांचा ‘चिरेबंदी कृषी बाजार आणि दुर्बल शेतकरी’ या ग्रंथांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

सर्वोत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार डॉ. चित्रा कुरहे आणि सुभाष वारे यांना प्रदान करण्यात आला. उत्तेजनार्थ पुरस्कार डॉ. प्रकाश पवार, प्रा. डॉ. रोहिदास जाधव यांना देण्यात आला. तर संशोधनातील पुरस्कार जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील डॉ. मिलिंद आवाड यांना प्रदान करण्यात आला.

डॉ. नितीन करमळकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांनी केवळ भारताचे नाही तर जगाचे नेतृत्व केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरू केलेले हे पुरस्कार प्रशंसनीय आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: