पिण्याचे पाणी द्या, नाहीतर टॅंकरचा खर्च द्या – आपची मनपाकडे मागणी

पुणे : पुण्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना विशेषत: शहराच्या परीघाकडील बाजूला राहणाऱ्या रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. टॅंकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी चोरी, पाणी गळती होत असून यामागे टँकर माफियांचे हितसंबंध दडलेले आहेत. सदर टँकर माफियांना प्रस्थापित राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांचे संरक्षण असल्यामुळे या बद्दल कोणतीही कारवाई केली जात नाही. सदर टँकर माफियांविरोधात आणि पाणीटंचाईच्या विरोधात नागरिकांचा असंतोष वाढत आहे. याबद्दल आज आम आदमी पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन “पाणी द्या अथवा टॅंकरचा खर्च द्या” ही मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला. आजच्या पत्रकार परिषदेला डॉ अभिजित मोरे सुदर्शन जगदाळे, किरण कद्रे, किरण कांबळे, अनिल कोंढाळकर, निरंजन आढागळे यांनी संबोधित केले.

आम आदमी पार्टीच्या वतीने पाणी प्रश्नाबाबत पुणे महानगरपालिका आयुक्तांना दुसरे निवेदन सादर करण्यात आले. महानगरपालिकेचा अधिकृत टॅक्स भरणाऱ्या सोसायट्यांना दर महिना लाखो रुपयांचे पाण्याच्या टँकरचे बिल भरावे लागत आहे. पुणे महानगर पालिका प्रशासन मात्र याबाबत कारवाई करताना दिसत नाही. यामुळे आम आदमी पार्टीच्या वतीने आप पीएमसी जल हक्क आंदोलन माध्यमातून”पाणी द्या अन्यथा टँकर चा खर्च द्या” अशी मागणी करण्यात आली आहे. पाणी प्रश्नावरील दुसरे पत्र पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार व पुणे महानगरपालिका मुख्य अभियंता पाणी पुरवठा विभाग अनिरुद्ध पावसकर यांना देण्यात आले. यावेळी सुदर्शन जगदाळे, उमेश बागडे, आबासाहेब कांबळे, शिवशंकर मुळे, निरंजन आढागळे आदी उपस्थित होते.

आपच्या वतीने विजय कुंभार यांनी 30 मार्च रोजी पहिले पत्र पुणे मनपा आयुक्तांना देत सोसायट्यांचा पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती. परंतु प्रशासनाने योग्य उपाययोजना न केल्याने सोसायट्यांना लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. काही सोसायट्या तर महिना लाखो रुपये पाण्याच्या टँकरवर खर्च करत आहेत.

प्रशासन कारवाई करत नसल्याने आपच्या वतीने दुसरे पत्र देखील प्रशासनाला देण्यात आले असून नागरिकांच्या उद्रेकाचा सामना प्रशासनाला करावा लागेल. असे आम आदमी पक्षाच्या पत्रकार परिषदेमध्ये आबासाहेब कांबळे यांनी सांगितले.

तसेच पुणे महानगरपालिकेचे प्रशासन योग्य उपाययोजना करत नसल्यामुळे प्रशासना विरोधात पुणे शहरभर ‘जल हक्क आंदोलन’ सुरू करण्यात येणार आहे असे सुदर्शन जगदाळे यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: