Parbhani : आत्‍मनिर्भर भारत बनविण्‍यासाठी कृषि पदवीधरांनी योगदान द्यावे – राज्‍यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्‍यारी

परभणी : देशाला स्‍वातंत्र्य मिळाले तेव्हा भारत अन्‍नधान्‍याबाबत आयातदार देश होता. कृषि तंत्रज्ञानाच्‍या जोरावर अन्‍नधान्‍यात वाढ करून देशात हरितक्रांती झाली, आज भारत अन्‍नधान्‍यात निर्यातदार देश झाला आहे, सर्व कृषि संशोधनातुन शक्‍य झाले. आज शेजारील देशात अन्‍नाची कमतरता आहे. आत्‍मनिर्भर भारत निर्माण करण्‍यासाठी कृषि पदवीधरांनी योगदान दयावे, असे प्रतिपादन राज्‍यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्‍यारी यांनी केले.

येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा २४ वा दीक्षांत समारंभ प्रसंगी अध्‍यक्षस्‍थानावरून कुलपती श्री. कोश्यारी हे दूरदृश्‍य प्रणालीव्‍दारे बोलत होते. यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन कृषिमंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती दादाजी भुसे, उदयपुर (राजस्‍थान) येथील महाराणा प्रताप कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नरेंद्र सिंह राठौर, स्‍वागताध्‍यक्ष कुलगुरू डॉ. अशोक ढवण विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य आमदार डॉ. राहुल पाटील, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, राष्‍ट्रीय डांळिब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजीव मराठे, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम, उपकुलसचिव डॉ. गजानन भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्‍यपाल मा. श्री. भगत सिंह कोश्‍यारी पूढे म्‍हणाले की, शेती हेच जीवनाचा आधार असुन अन्‍न हे ब्रम्‍ह आहे. युवकांनी संत महात्‍मांपासुन आदर्श घेऊन समर्पित भावनाने आपल्‍या ज्ञानाचा उपयोग देश व समाज कल्‍याणासाठी करावा. कृषि विकासात परभणी कृषि विद्यापीठाचे भरीव असे योगदान असुन विद्यापीठातील डिजिटल शेतीवर आधारित प्रकल्‍प अत्‍यंत चांगला उपक्रम आहे.

यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे  म्‍हणाले की, आज वसुंधर दिवस आहे, वसुंधरेचे रक्षण करण्‍याची जबाबदारी सर्वावर आहे. शेती पुढे अनेक समस्‍या असुन कृषि विद्यापीठांनी संशोधनाच्‍या माध्‍यमातुन बदलत्‍या हवामानास अनूकूल तंत्रज्ञान व वाणांची निर्मिती करावी. मागील पन्‍नास वर्षाच्‍या कार्यकाळात संशोधनाच्‍या आधारे परभणी कृषि विद्यापीठाने विविध पिकांचे उन्नत वाण, यंत्रे व औजारे विकसित केले असुन अनेक कृषि तंत्रज्ञान शिफारशी दिल्‍या आहेत, हे सर्व तंत्रज्ञान शेतकरी बांधवाच्‍या  बांधापर्यंत पोहचले पाहिजे. कृषिच्‍या पदवीधरांनी कोणत्‍याही क्षेत्रातात कार्य करतांना शेती व शेतकरी कल्‍याणाकरिता कार्य केले पाहिजे. जागतिकस्‍तरावर डिजिटल शेतीचे वारे वाहत आहे,  देशात कृषिक्षेत्रात यंत्रमानव व ड्रोन यंत्राचा वापर वाढणार असुन यात मनुष्‍यबळ निर्मितीचे कार्य परभणी कृषी विद्यापीठातील राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पात कार्य चालु आहे, आधुनिक तंत्रज्ञान शेवटच्‍या शेतक-यापर्यंत पोहचले पाहिजे. शेतकरी बांधवाच्‍या शेतमाल अधिक भाव मिळावा याकरिता महाराष्‍ट्र  शासनाच्‍या कृषि विभागाव्‍दारे  विकेल ते पिकेल उपक्रम राबविण्‍यात येत आहे, शेतकरी बांधवाचा शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहचण्‍यासाठी प्रयत्‍न सुरू आहेत. शेतमालावर कृषि प्रक्रिया करून मुल्‍यवर्धनावर भर दिला जात आहे. महाराष्‍ट्र सरकार २०२२ हे वर्ष महिला शेतकरी सन्मान वर्ष म्हणून साजरे करित आहे.  शेतकरी महिला सक्षमीकरणासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे. शेतकऱ्यांचा शेतीमाल आणि महिला बचत गटाची उत्पादने विक्रीसाठी शासकीय जागा उपलब्ध करुन दिल्या जातील. कृषी विभागाच्या ५० टक्के योजना महिला शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवण्‍यात आल्‍या आहेत. महिला बचत गट आणि शेतकरी उत्‍पादक कंपन्‍यांना बळ देण्‍याचे कार्य शासन करित आहे. आज कृषि शिक्षणात मुलींचे प्रमाण वाढत आहेत, या पदवीधारक मुलींनीही शेतकरी महिला सक्षमीकरणाकरिता योगदान दयावे, शालेय स्‍तरावर कृषि विषयाचा समावेश करण्‍यात येणार असुन यात कृषि पदवीधर आपले योगदान देऊ शकतील, अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

Leave a Reply

%d bloggers like this: