समृद्ध जीवनासाठी आत्मसात करावेत महामानवांचे विचार – नागराज मंजुळे

पुणे : “छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महामानवांनी आपल्याला समृद्ध विचारांचा वारसा दिला आहे. जीवनाला आकार देण्यासाठी त्यांच्या विचारांना आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. महामानावांच्या नावाने केवळ जल्लोष न करता त्यांच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक व अभिनेते नागराज मंजुळे यांनी केले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) प्रभाग ११ आणि विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती यांच्या वतीने नागराज मंजुळे व झुंड या सिनेमातील कलाकारांचा नागरी सन्मान करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भिमोत्सव कार्यक्रमात रिपाइं नेते परशुराम वाडेकर व माजी उपमहापौर सुनीता वाडेकर यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा झाला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, संरक्षण व धोरण विभाग प्रमुख डॉ. विजय खरे यांच्यासह इतर मान्यवर, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागराज मंजुळे म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सर्वांच्या जीवनाचा उद्धार करण्याचे काम केले आहे. त्यांच्या हातातले पुस्तक आपल्या सर्वांना प्रेरक आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या स्वरूपाचे आपले जीवन असावे. माझ्या आयुष्यातही अनेक प्रकारच्या संघर्षानंतर मला यश मिळाले. माझ्या या यशात या महापुरुषांच्या विचारांचा मोठा वाटा आहे. वाडेकर दाम्पत्याने खऱ्या अर्थाने आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर गोरगरीब जनतेसाठी काम उभारले आहे, याचा आनंद वाटतो.”

परशुराम वाडेकर म्हणाले, “वास्तवाशी भिडणारे लेखन आणि सिनेमातील मांडणी ही मंजुळे यांची खासियत आहे. त्यांचे सिनेमे पाहताना आपण स्वतःला त्यात अनुभवतो. झुंड सारख्या सिनेमातून त्यांनी वंचितांच्या प्रश्नांना हात घातला आहे. अगदी वास्तवाला भिडणारी ही कलाकृती आहे. या सिनेमातील सर्वच कलाकारांना सन्मानित करताना आम्हाला आनंद वाटतो.”

डॉ. एन. एस. उमराणी, डॉ. विजय खरे यांनीही मनोगते व्यक्त केली. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. सुनीता वाडेकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: