पीएमपीएमएल चा १५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
पुणे : पीएमपीएमएल चा १५ वा वर्धापनदिन अनेक विविध उपक्रमांनी पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरूरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पंडीत जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन घोले रोड येथे साजरा करण्यात आला.
यावेळी पीएमपीएमएलचे सर्व विभाग प्रमुख, सर्व आगार व्यवस्थापक, सर्व सहाय्यक आगार व्यवस्थापक, सर्व आगार अभियंता यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१५ व्या वर्धापन दिनानिमित्त पीएमपीएमएल बस प्रतिकृती असलेला केक कापण्यात आला. यावेळी प्रवाशांकरीता आयोजित केलेल्या ‘लकी ड्रॉ’ ची सोडत, क्रिकेट व कबड्डी स्पर्धेचे बक्षीस वितरण, पीसीआरए विजेत्या आगारांचा गौरव आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पीएमपीएमएल च्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार दि.१८ एप्रिल रोजी ‘बस डे’ साजरा करण्यात आला. ‘बस डे’ दिवशी बस मधुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ‘लकी ड्रॉ’ योजना प्रथमच आयोजित केली होती. त्या ‘लकी ड्रॉ’ ची सोडत यावेळी काढून विजेत्या प्रवाशांची नावे घोषित करण्यात आली.
विजेत्या प्रवाशांची नावे पुढील प्रमाणे : प्रथम क्रमांकाचे वार्षिक मोफत पासचे बक्षीस सुषमा सदाशिव भुजबळ (रा. वाकड), व्दितीय क्रमांकाचे सहामाही मोफत पासचे बक्षीस संदीप सिंह (रा. अहमदनगर), तृतीय क्रमांकाचे त्रैमासिक मोफत पासचे बक्षीस रंजना बळी (रा. कोंढवा) यांना मिळाले. तसेच उत्तेजनार्थ त्रैमासिक मोफत पासचे बक्षीस सृष्टी संतोष सकट (रा. दिघी), दिलीप विरा सरवदे (रा. सोलापूर), आदिती कुदळे (रा. दत्तवाडी), संगीता देवेंद्र साळुंके (रा. दत्तवाडी), प्रविण अशोक कांबळे (रा. कोंढवा बु.), सुबोध साळवे (रा. धानोरी), हिमांशू शिवाजी तांबे (रा. भेकराईनगर), सौम्या गायकवाड (रा. मांजरी), राहुल सोनकांबळे (रा. बिबवेवाडी), ऐश्वर्या सतिश पाटील (रा. पिंपळे सौदागर), कोंडीबा येडवे (रा. आंबेगाव), राणी धनंजय धानिवेल (रा. मावळ), सुरेश शंकर कांबळे (रा. खडकी), धीरज दुबे (रा. निगडी) यांना मिळाले आहे.
वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेतील प्रथम विजेत्या निगडी आगार संघास ५ हजार बक्षीस व चषक तर उपविजेत्या कात्रज आगार संघास ३ हजार बक्षीस व चषक देऊन गौरविण्यात आले. कबड्डी स्पर्धेतील विजेत्या हडपसर आगार संघास ५ हजार बक्षीस व चषक तर उपविजेत्या भोसरी आगार संघास ३ हजार बक्षीस व चषक देऊन गौरविण्यात आले. ‘बस डे’ दिवशी सर्वात जास्त बस मार्गस्थ केल्याबद्दल न.ता.वाडी आगार व्यवस्थापक, सहाय्यक आगार व्यवस्थापक, आगार अभियंता यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ‘बस डे’ दिवशी जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या कात्रज आगार व्यवस्थापक, सहाय्यक आगार व्यवस्थापक, आगार अभियंता यांचा सत्कार करण्यात आला. पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान (पीसीआरए) कडुन इंधन बचतीसाठी स्वारगेट व पिंपरी आगारास मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्या दोन्ही आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.
वर्धापन दिनानिमित्त पीएमपीएमएल बस प्रतिकृती असलेल्या केक कापण्याचा मान एका चालक वाहक जोडीला देण्यात आला. १५ व्या वर्धापन दिनानिमित्त पीएमपीएमएल च्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना पेढे वाटप करण्यात आले. रक्षाबंधन सणा निमित्त स्टॅन्ड बुकींग करून एका दिवसात १ लाख रूपये उत्पन्न आणल्याबद्दल भोसरी आगाराचे वाहक श्री. कुंदन काळे यांचाही सत्कार करण्यात आला.
अवंतिका भोर या विद्यार्थीनीने तिने रचलेल्या कवितेव्दारे पीएमपीएमएल बाबतच्या भावना प्रकट केल्या. दुर्गा ब्रिगेड यांनी पीएमपीएमएल बाबत समाजप्रबोधनपर पथनाट्य सादर केले. या पथनाट्यात त्यांनी पीएमपीएमएलचे चालक व वाहक दिवसरात्र प्रवाशांची सेवा कशा प्रकारे करतात व प्रवाशांना कशा प्रकारे सहकार्य करतात याचे सुंदर सादरीकरण केले. तसेच पीएमपीएमएल वर आधारित एक कविताही सादर केली. पथनाट्याला व कवितेला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाट करून दाद दिली.
याप्रसंगी बोलताना पीएमपीएमएलच्या सहव्यवस्थापकीय संचालक मा. डॉ. चेतना केरूरे म्हणाल्या, “सर्व विभागप्रमुख, अधिकारी, चालक, वाहक व इतर कर्मचारी नेहमीच्या आयुष्यात व्यग्र असतात त्यातून त्यांना विरंगुळा मिळावा यासाठी आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आपली संस्था प्रवाशीभिमुख असल्याने त्यांच्या सोबतचे संवाद वाढावेत यासाठी हा प्रयत्न आहे. ‘लकी ड्रॉ’ला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. ज्यांनी या योजनेची माहिती प्रवाशांपर्यंत पोहचवली अशा वाहकांचे काम कौतुकास्पद आहे. आपण उत्स्फूर्तपणे संस्थेसाठी काही तरी करावे अशी जाणीव प्रत्येक कर्मचाऱ्यांमध्ये रूजत नाही तो पर्यंत आपण संस्थेला प्रगतीपथावर नेऊ शकत नाही. हि संस्था म्हणजे एक कुटुंब आहे आणि हे कुटुंब जगले तर आपण जगणार आहे अशी भावना कायम रहावी. या आठवड्यात असलेले कार्यक्रम संपले की विषय संपला असे नाही तर आपण वर्षभर प्रत्येक महिन्याच्या १९ तारखेला कार्यक्रमाचे आयोजन करून नागरीक, प्रवाशी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतल्याबद्दल ते कौतुकास पत्र आहेत.”
चिफ मेकॅनिकल इंजिनिअर सुनील बुरसे यांनी प्रास्ताविक केले. आर जे अक्षय यांनी सूत्रसंचालन केले.
