fbpx
Monday, June 17, 2024
ENTERTAINMENTLatest News

दुसऱ्या मिती लघुपट महोत्सवाची घोषणा; अभिनेते अजय पूरकर यांच्या हस्ते पोस्टरचे प्रकाशन

पुणे : लघुपटांच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करण्यासाठी सर्जनशील तरुण पिढीला एक हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने दुसऱ्या मिती लघुपट महोत्सवाचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पावनखिंड चित्रपटातील बाजीप्रभू देशपांडे यांची लोकप्रिय भूमिका साकारणारे प्रख्यात मराठी अभिनेते अजय पूरकर यांनी आज याबाबत घोषणा केली. यावेळी महोत्सवाच्या पोस्टरचेही प्रकाशन पूरकर यांनी केले. या प्रसंगी महोत्सवाचे आयोजक मिती फिल्म सोसायटीचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी, सचिव आमोद खळदकर, खजिनदार अजिंक्य खरे तसेच महोत्सवाचे सह-आयोजक डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजनचे चेअरमन मिलिंद कांबळे व संचालक गिरीश केमकर उपस्थित होते.

महोत्सवाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन –
या प्रसंगी महोत्सवासाठी विशेषत्वाने तयार करण्यात आलेले संकेतस्थळ (Website) http://www.msffpune.com याचेही उद्घाटन करण्यात आले. महोत्सवासंबंधी सर्व माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध असून स्पर्धेसाठीची नोंदणी या संकेतस्थळावरून करता येणार आहे.

येत्या १५ जुलैपर्यंत स्पर्धकांनी आपापले लघुपट पाठवावेत असे आवाहन यावेळी आयोजकांतर्फे करण्यात आले. महोत्सवासाठी कोणत्याही विषयाचे बंधन नसून ही स्पर्धा खुल्या स्वरूपाची असणार आहे. लघुपटाचा अधिकाधिक कालावधी हा २० मिनिटे इतका निर्धारित करण्यात आला असून प्रवेश मूल्य रुपये ३०० इतके आहे. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय स्थान पटकावणाऱ्या लघुपटांस पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक, छायाचित्रकार, अभिनेता, अभिनेत्री, संगीत दिग्दर्शक व संकलक अशी वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. रोख रक्कम, सन्मान चिन्ह व प्रशस्तिपत्र अशी मिळून एकूण ६५ हजार रुपयांची पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दिनांक ६ व ७ ऑगस्ट रोजी होणार आहे.

स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीनिमित्त विशेष स्पर्धा – India @75
यंदाचे वर्ष हे भारतीय स्वातंत्र्याचे पंच्याहत्तरावे वर्ष आहे. त्यानिमित्त काही विशेष विषयांची स्पर्धाही यावर्षी घेतली जाणार आहे. त्यासाठीचे विषय खालीलप्रमाणे –
१) सामान्य माणसाचे देशासाठी योगदान
२) भारतीयांनी मिळविलेली पेटंटस्
३) व्होकल फॉर लोकल
या विषयांवरील लघुपटास सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व रोख रकमेसह अतिरिक्त पारितोषिक देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading