डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पहिली जयंती साजरी झालेल्या चिखलवाडीत राष्ट्रीय स्मारक करा

भाजपा चिटणीस सुनील माने यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली जयंती चिखलवाडीत साजरी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक चिखलवाडीत व्हावे, अशी मागणी भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी आज मुख्यमंत्री उद्घवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे. या मागणीचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्घव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाला इमेल द्वारे पाठवले आहे.

पत्रात म्हटले आहे की, आज जगभरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात. या जयंतीची सुरुवात पुणे शहरातील चिखलवाडी येथे करण्यात आली होती. येथील जनार्दन रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ साली जगात पहिल्यांदा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली होती. खडकी पत्रविभाग दलित मंडळाचे अध्यक्ष असताना आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून त्यांनी बाबासाहेबांची प्रतिमा हत्तीच्या अंबारीत ठेऊन प्रभात फिल्म कंपनीच्या रथामधून उंटावरून प्रचंड मिरवणुका काढल्या होत्या. यांनतर खडकी बाजार परिसरात प्रत्येक वस्तीत बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होऊ लागली. या सर्व वस्त्यांचे बाबासाहेबांनी एकीकरण घडवून दलित मंडळाची स्थापना केली. या मंडळातर्फे आंबेडकरांची जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी केली. त्यामुळे बाबासाहेबांच्या चळवळीचे प्रमुख केंद्र असलेल्या चिखलवाडी येथे बाबासाहेबांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री या नात्याने आपण प्रयत्न करावेत.

जुन्या काळातील एक थोर सामाजिक कार्यकर्ते जनार्दन सदाशिव रणपिसे यांचा जन्म सासवड येथे २४ ऑगस्ट १८९८ मध्ये झाला. ज्या काळात शिक्षणाच्या सोयी सवलती उपलब्ध नव्हत्या त्या काळी पुणे जिल्ह्यातील महार समाजातील ते पहिले मॅट्रिक्युलेट झाले होते. जुन्या चालीरीती विरुध्द रणपिसे यांनी मोठी चळवळ केली हे पाहून बाबासाहेबांनी त्यांच्या कार्याला नारायणगाव येथील परिषदेत पाठींबा दिला होता. पुण्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र अर्पण करण्यात व पाच हजार रुपयांचा इमारत निधी उभा करण्यात रणपिसे यांचा सिंहाचा वाटा होता.

Leave a Reply

%d bloggers like this: