Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : प्रत्यक्षदर्शीची उलटतपासणी पूर्ण, पुढची सुनावणी २७ एप्रिलला  

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची उलटतपासणी आज पूर्ण झाली. तर या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ एप्रिल रोजी होणार आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे.

या प्रकरणात सनातन संस्थेशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर यांच्याविरोधात कट रचणे, हत्या करणे, बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार आरोप निश्चित करण्यात आले आहेत. त्यांच्यासह अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे अशा पाच आरोपींवर आरोप निश्चिती करण्यात आली आहे. या घटनेचा साक्षीदार असलेल्या पुणे महानगर पालिकेच्या स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्याची मार्च महिन्यात साक्ष नोंदविण्यात आली होती.

डॉक्टर दाभोलकर यांच्यावर अंदुरे आणि कळसकर यांनी गोळीबार केला आणि त्यानंतर दोघे तेथून फरारी झाले, अशी साक्ष या कर्मचाऱ्याने नोंदवली होती. त्यावर बचाव पक्षातर्फे अॅड. प्रकाश साळसिंगीकर, अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अॅड. सुवर्णा आव्हाड-वस्त यांनी गेल्या तीन सुनावण्यांमध्ये या साक्षीदाराची उलटतपासणी घेतली. या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने सहा साक्षीदार न्यायालयासमोर सादर केले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ एप्रिल रोजी होणार आहे. डॉ. दाभोलकर यांचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरची साक्ष आणि उलटतपासणी पुढील सुनावणीत नोंदविण्यात येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading