प्रशासक आल्यानंतर पहिल्यांदा सोमवारी होणार पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा

पुणे : पुणे महापालिकेत प्रशासक राज आल्यानंतर प्रथमच (सोमवारी) महापालिकेची एप्रिल महिन्याची मुख्यसभा होणार आहे. स्थायी समिती, शहर सुधारणा समितीमधून आलेल्या प्रस्तावांवर यावेळी मंजुरी दिली जाईल. मात्र, ही मुख्यसभा महापालिकेच्या सभागृहात नाही तर आयुक्तांच्या कार्यालयातच होणार आहे.

पुणे महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत १४ मार्च रोजी संपली. १५ मार्च पासून महापालिका आयुक्त विक्रम कुमार हे प्रशासक म्हणून शहराचा गाडा हाकत आहेत. यामध्ये त्यांनी दोन स्थायी समितीच्या बैठका घेतल्या तसेच एक शहर सुधारणा समितीची बैठक घेऊन प्रस्ताव मंजूर केले.

महापालिकेची मुख्यसभा म्हटल्यानंतर सभागृहात महापौरांच्या अध्यक्षतेखाली ही सभा भरते, त्यात नगरसेवक त्यांचेच मुद्दे मांडतात, प्रशासनाकडून त्यावर खुलासा केला जातो. अनेकदा आंदोलनही केले जाते. तर नगरसचिवांकडून महापालिका कामकाज नियमावलीनुसार मुख्यसभा चालवत असतात. पण सोमवारी होणाऱ्या मुख्यसभेत हे चित्र पाहायला मिळणार नाहीत. ही सभा नागरिकांसाठी खुला असणार नाही. महापालिका आयुक्त यांच्या कार्यालयात प्रशासक म्हणून विक्रम कुमार, नगरसचिव शिवाजी दौंडकर व इतर अधिकारी यावेळी उपस्थित असतील. नगरसचिव विभागाने मुख्यसभेची कार्यपत्रिका तयार केली आहे. त्यानुसार प्रस्ताव घेऊन त्यास मंजुरी दिली जाईल. 

सोमवारी दुपारी तीन वाजता महापालिकेची मुख्यसभा होत आहे, यावेळी स्थायी समिती व शहर सुधारणा समितीमध्ये प्रस्ताव मंजूर केले जातील. ही सभा आयुक्तांच्या कार्यालयात होईल.
शिवाजी दौंडकर, नगरसचिव, महापालिका

Leave a Reply

%d bloggers like this: