विनाशाकडे जाण्याची प्रक्रिया थांबविण्याचे सामर्थ्य तरुणांमध्ये : भारत सासणे

पुणे : आत्ताचा कालखंड हा विद्वेषाचा, विद्वेष वृद्धीचा कालखंड आहे. प्रत्येक दिवशी आपण विनाशाकडे जात आहोत. विनाशकडे जाण्याची प्रक्रिया थांबविण्याचे सामर्थ्य केवळ तरुणांमध्ये आहे. भविष्यातील वास्तवाला तोंड देण्याची सुरुवात आतापासूनच करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन उदगीर येथ होत असलेल्या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष, ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांनी केले. आपल्या मनातील विवेकाचा आवाज काय सांगतो हे खूप महत्त्वाचे आहे. समाज जेव्हा आतला आवाज ऐकायला लागेल तेव्हा अंध:काराचे पटल दूर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भारती विद्यापीठाअंतर्गत असलेल्या यशवंतराव मोहिते कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील ‘कलाभारती’अंतर्गत आयोजित करण्यात येत असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन सासणे यांच्या हस्ते आज (दि. 8 एप्रिल 2022) झाले. त्या वेळी ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महात्मा गांधी लिखित ‘माझे सत्याचे प्रयोग’ या पुस्तकातील एका परिच्छेदाचे अभिवाचन आणि दीप प्रज्वलित करून सासणे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. विवेक रणखांबे होते. प्रा. डॉ. सदाशिव पाटील, डॉ. विलास साळुंखे, जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतनचे प्राचार्य राजेंद्र उत्तुरकर, उपप्राचार्य बी. एन. पवार, उपप्राचार्य विजय अडसूळ व्यासपीठावर होते. 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भारत सासणे यांचा डॉ. विवेक रणखांबे यांनी विशेष सत्कार केला.
महाविद्यालयातील विद्यार्थी खुशबू अग्रवाल (नेपाळ), अवूर ट्रेसी योल (साऊथ सुदान) यांनी अनुक्रमे हिंदी आणि इंग्रजी भाषेत अभिवाचन केले. तर पु. ल. देशपांडे लिखित ‘बिगरी ते मॅट्रीक’ याचे कथाकथन प्राचार्य राजेंद्र उत्तुरकर यांनी केले.
सासणे म्हणाले, ज्या शक्ती देशाला ज्या पद्धतीने घेऊन जात आहेत ती दिशा योग्य आहे की नाही, त्याला किती साथ द्यायची, द्यायची की नाही हे तरुणांनीच ठरवायचे आहे. ‘माझे सत्याचे प्रयोग’ या पुस्तकाचे, वैचारिक साहित्याचे वाचन करावे, विचारधन एकत्र करावे, देश-विदेशात कोणी काय विचार मांडले आहेत, ते आपण कसे आत्मसात करू शकतो याचा विचार करावा, असा मौलिक सल्लाही सासणे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
विभाजनवादी शक्तींच्या ताब्यात आज आपण गेलो आहोत, तुम्ही आणि मी वेगळा, आपल्या कला वेगळ्या, सिनमे वेगळे अशा विभाजनावर उत्तर म्हणून आपले संविधान आणि सर्वधर्म समभाव मानून मानवतेचा आवाज ऐकणे गरजेचे असल्याचे सासणे यांनी शेवटी नमूद केले.
डॉ. विलास साळुंखे, डॉ. शारदा गडाळे यांचा सत्कार सासणे यांच्या हस्ते करण्यात आला.
भारती विद्यापीठाअंतर्गत महाविद्यालयात सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती प्राचार्य विवेक रणखांबे यांनी प्रास्ताविकात दिली. परिचय प्रा. डॉ. सदाशिव पाटील यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनुराधा जपे यांनी केले तर आभार डॉ. सुषमा पवार यांनी मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: