वसंत मोरे यांचा कार्यकाळ संपल्याने मला जबाबदारी दिली – साईनाथ बाबर

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेशी विसंगत भूमिका घेतली म्हणून वसंत मोरे यांना पुणे मनसे शहराध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला, अशा चर्चा सुरु असतानाच आजच पुणे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी नवनियुक्त शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यावर सोपवण्यात आला आहे. त्यानंतर पुण्यात आले असता बाबर यांनी या संपूर्ण राजकीयनाट्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांचा कार्यकाळ संपल्याने मला जबाबदारी दिली असल्याचे,  साईनाथ बाबर यांनी सांगितले.

पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना साईनाथ बाबर म्हणाले, पक्ष विरोधी भूमिका घेतल्याने वसंत मोरे यांना राज ठाकरेंनी मुंबईत बोलावलं नाही. अशी चर्चा सुरु आहे मात्र, ते कारण खोटं असून वसंत मोरे यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांची जबाबदारी मला दिली असल्याचं मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी सांगितले.

बाबर पुढे म्हणाले, ‘राज ठाकरेंनी जबाबदारी दिल्याने आनंद वाटतो. राज ठाकरेंनी काल फोन करून बोलावलं, आज जबाबदारी दिली. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यात राजकारण करण्याच काम करत आहे. वसंत मोरेंना भेटून आलो आहे आता मोरे माझ्यासोबत काम करणार आहेत असंही बाबर यांनी यावेळी सांगितलं. तर येत्या १५, १६, १७ तारखेला राज ठाकरे पुण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: