Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

‘फिटे अंधाराचे जाळे’ मधून अजरामर मराठी गीतांची सांगीतिक सफर

पुणे : संगीत क्षेत्रातील दिग्गज सुधीर फडके उर्फ बाबूजी, ग.दि. माडगूळकर, सुधीर मोघे, लता  मंगेशकर यांसह इतरही कलाकारांनी अजरामर केलेली गीते सादर करीत प्रख्यात गायक श्रीधर फडके व सहका-यांनी मराठी गीतांची सांगीतिक सफर पुणेकरांना घडविली. अवीट गोडीची व सुरेख चालीची गीते ऐकताना रसिक श्रोत्यांनी शब्द स्वरांचा संवाद यावेळी प्रत्यक्षपणे अनुभवला.
निमित्त होते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित संगीत महोत्सवाचे. महोत्सवात पहिल्या सत्रात तबला व बासरी अशी वाद्य जुगलबंदी रसिकांनी अनुभवली. त्यामध्ये सोहम गोराणे व अनहद वारसी यांनी वादन केले. तर, प्रख्यात गायक श्रीधर फडके यांचा फिटे अंधाराचे जाळे हा कार्यक्रम दुस-या सत्रात झाला.
देव देव्हा-यात नाही… या बाबूजींनी संगीतबद्ध केलेल्या आणि ग.दि. माडगूळकर यांच्या सदाबहार गीताने दुस-या सत्रात स्वर मैफलीला प्रारंभ झाला. त्यानंतर सादर झालेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींवरील देवाचिये द्वारी… या संत रचनेत श्रोते तल्लीन झाले. सुधीर मोघे यांचे सखी मंद झाल्या तारका… या गीताला रसिकांनी टाळ्यांनी भरभरून दाद दिली. शिल्पा पुणतांबेकर, शेफाली कुलकर्णी (सहगायन), तुषार आंग्रे (तबला), आदित्य आपटे (तालवाद्य), निलेश देशपांडे (बासरी), केदार परांजपे (कीबोर्ड) यांनी साथसंगत केली. सुकन्या जोशी यांनी निवेदन केले.
पहिल्या सत्रात सोहम गोराणे याने तबल्यावर पं. सुशीलकुमार जैन, उस्ताद झाकीर हुसैन यांच्या रचना सादर केल्या. तर, नांदेडच्या अनहद वारसी याने बासरीवर राग पुरीया धनाश्री व माझे माहेर पंढरी  हे गीते सादर केले. अभिषेक सिनकर याने त्यांना पेटीची साथ दिली.
गणेश कला क्रीडा मंच येथे दररोज सायंकाळी ५.३० ते ६.३० यावेळेत युवा कलाकार व सायंकाळी ७ ते १० यावेळेत दिग्गज कलाकार आपली कला सादर करणार आहेत. संगीत महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading