दृष्टिहिनांच्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत ६ व्या फेरी अखेर किशन गंगोलीची आघाडी कायम
सहाव्या फेरीअखेर ओडीसाच्या सौंदर्य कुमार प्रधान याने पाच गुणांसह दुसरे स्थान घेतले आहे. सुभेंदू कुमार पात्रा (ओडिसा), स्वप्निल शाह, आर्यन जोशी (दोन्ही महाराष्ट्र), अश्विन मकवाना (गुजरात), के.मारीमुथु व सॅम पेनियल (तामिळनाडू) हे संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांचे प्रत्येकी साडेचार गुण झाले आहेत.
सहाव्या फेरीतील पहिल्या पटावर किशन व मिलिंद यांच्यातील लढती विषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. मिलिंद याने अनुभवी खेळाडू किशन याला चांगली लढत दिली मात्र विजेतेपदाबाबत मक्तेदारी असलेल्या किशन याने कल्पक चाली करीत शानदार विजय मिळवला. मिलिंद हा चार गुणांवरच राहिला आहे.
दुसऱ्या पटावर स्वप्निल शाह व सुभेंदू कुमार यांच्यातील डाव रंगतदार झाला. दोन्ही खेळाडूंनी डाव जिंकण्यासाठी वेगवेगळे डावपेच वापरले तथापि डावातील गुंतागुंत वाढल्यानंतर दोन्ही खेळाडूंनी बरोबरीचा प्रस्ताव मान्य केला. तिसऱ्या पटावर प्रधान याने तामिळनाडूच्या आर. गोपी याच्यावर निर्णायक विजय मिळवताना प्यादी व मोहरे याचा अतिशय खुबीने उपयोग केला. त्याच्या आक्रमक चालींपुढे गोपी याचा बचाव निष्प्रभ ठरला आणि गोपी याला पराभव मान्य करण्याखेरीज अन्य कोणताही पर्याय नव्हता.
चौथ्या पटावर अनुभवी खेळाडू अश्विन मकवाना याने आपलाच सहकारी संयम शहा याच्यावर सफाईदार विजय मिळविला. डावाच्या मध्यास त्याने खेळावर नियंत्रण मिळविले आणि शेवटपर्यंत ते कायम ठेवीत डाव जिंकला. महाराष्ट्राचा आर्यन यानेही अतिशय सुंदर खेळाचा प्रत्येक घडवित गुजराच्या दर्पण इनानी याला पराभूत केले. मारीमुथु याला केरळच्या एम. शिदाद याच्याविरुद्ध डाव जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागला त्याचा सहकारी पेनियल याने शानदार विजय मिळवताना बी. राजकुमार याला पराभूत केले.
दृष्टीहिनांच्या आगामी आशियाई आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धांसाठी भारताच्या खेळाडूंची निवड याच स्पर्धेतून केली जाणार असल्यामुळे या स्पर्धेला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे.
