Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

पुण्यात पाणी प्रश्न पेटला; राष्ट्रवादीने खासदार गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर केले आंदोलन

पुणे : ऐन उन्हाळ्यात पुणेकरांना पाणी प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या वतीने खासदार गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. गेली ५ वर्ष पुणे महानगरपालिकेत भाजपची सत्ता होती. त्यामुळे पाणी प्रश्नांची जबाबदारी घेवून पुण्याचे खासदार भाजप नेते गिरीश बापट यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून यावेळी करण्यात आली.

या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर प्रवक्ते प्रदीप देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्ष मृणाल वाणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे ,राष्ट्रवादीचे पुणे महानगर पालिकेतील नगरसेवक व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलनाच्या वेळी “अहो बापट, काय हे नाटक? सत्तेचे अपयश लपवण्यासाठी कसली ही आदळआपट” , “पाणी देणार होते 24 तास, मात्र पाणी मिळेना आम्हाला धड दोन तास”, “24×7 योजनेचे काय झाले..?” , “गिरीश बापट जवाब दो”, “खासदार साहेब झाली का झोप…?” या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

प्रशांत जगताप म्हणाले, “पुणे शहरात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पार्टीला गेल्या पाच वर्षात शहरातील पाणीपुरवठ्याचे कुठल्याही प्रकारचे नियोजन करता आले नाही. संपूर्ण शहरात अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी येणे, दुरुस्तीच्या नावाखाली आठवड्यात एक दिवस पाणीपुरवठा बंद असणे, पाणी न येणे असे प्रकार वारंवार घडत असून भाजपचे अपयश आहे. पुणेकरांच्या या मनस्तापाला केवळ भाजप जबाबदार आहे. २०१७ च्या निवडणुकीपूर्वी 24×7 पाणीपुरवठा करणार असल्याचे सांगत भाजप सत्तेत आली. आज प्रत्यक्षात परिस्थिती अशी आहे की २४ तास तर सोडा हक्काचे १ तास सुध्दा पाणी मिळत नाही.

मुळात समान पाणी वाटप योजनेचे काम तीन वर्षात पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु पाच वर्ष होऊन देखील भाजपलाही काम पूर्ण करता आले नाही. या कामाची झळ आज समस्त पुणेकरांना बसत आहे. हा सर्व गलथान कारभार सुरू असताना पुणे शहराचे भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. आता प्रशासक आल्यानंतर मात्र झोपेतून जागे झालेल्या कुंभकर्ण प्रमाणे ते जागे झाले असून त्यांना अचानकपणे पुणेकरांच्या प्रश्नांची जाण जाणीव होऊ लागली आहे, असेही प्रशांत जगताप म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading