Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

ऑस्ट्रेलियन शिक्षणाला पुण्यात प्रोत्साहन देण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या सरकारचा ‘स्टडी ऑस्ट्रेलिया’ रोड शो

पुणे  : जागतिक दर्जाचे शिक्षण, अभ्यासानंतरच्या कामाच्या संधी आणि राहणीमानाची गुणवत्ता यांकरीता अनेक भारतीय विद्यार्थी गेल्या काही वर्षांपासून ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षण घेण्याचा पर्याय निवडत आहेत. या अनुषंगाने, पुणे विभागातील विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियामध्ये शिकण्यासाठी आकर्षित करून घेण्यासाठी, ऑस्ट्रेलियन व्यापार व गुंतवणूक आयोगाने पुणे शहरात आज एक ‘रोड शो’ आयोजित केला. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या सरकारने सुरू केलेल्या विविध उपक्रमांवर या रोड शोमध्ये भर देण्यात आला.

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आणि पदवीधरांना ऑस्ट्रेलियन सरकारतर्फे नवीन व्हिसासंबंधी सहाय्य पुरविण्यात येत आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थी व्हिसा शुल्क परतावा व कोविड-१९ व्हिसा शुल्क माफी, इंग्रजी भाषेच्या चाचण्या व आरोग्य तपासणीसाठी अतिरिक्त वेळ, तात्पुरता पदवीधर व्हिसा बदलणे आणि ‘मुक्काम आणि काम’ या योजनेचा विस्तारित कालावधी, या सुविधांचा समावेश आहे. याशिवाय, १९ जानेवारी ते १९ मार्च २०२२ या दरम्यान ऑस्ट्रेलियात आलेल्या व पूर्ण लसीकरण झालेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी व्हिसाधारकांना व्हिसाच्या अर्जाच्या शुल्क परताव्यासाठी पात्र ठरविण्यात आले आहे. सध्याच्या व्हिसाधारकांना आणि नवीन विद्यार्थ्यांना हा परतावा मिळू शकेल. यासाठी पात्र ठरलेले व्हिसाधारक ३१ डिसेंबर २०२२पर्यंत कधीही दावा करू शकतील.

एक फेब्रुवारी २०२० रोजी किंवा त्यानंतर विद्यार्थी व्हिसा घेतलेले आणि कोविड-१९च्या साथीमुळे आपल्या मूळ व्हिसा कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करू न शकलेले सध्या ऑस्ट्रेलियात राहणारे विद्यार्थी हे व्हिसा अर्ज शुल्क (व्हीएसी) माफ करून घेण्यास पात्र ठरतील. विद्यार्थी व्हिसासाठी नव्याने अर्ज करताना त्यांना ही सवलत मिळेल.

आंतरराष्ट्रीय विद्यार्थी व्हिसाधारकांसाठी कामाच्या निर्बंधांमध्ये तात्पुरती शिथिलता, याचा अर्थ, ऑस्ट्रेलियामध्ये शिकत असताना विद्यार्थी किती तास काम करू शकतात, यावर सध्या कोणतेही निर्बंध नाहीत. या बदलांचे एप्रिल २०२२मध्ये पुनरावलोकन केले जाईल. अर्थात याकरीता विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाची समाधानकारक नावनोंदणी, वर्गातील उपस्थिती आणि अभ्यासातील प्रगती यांचे निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.

वैध तात्पुरता ग्रॅज्युएट व्हिसा (उपवर्ग ४८५) धारण केलेले जे पदवीधर १ फेब्रुवारी २०२० ते १४ डिसेंबर २०२१ या कालावधीत ऑस्ट्रेलियाच्या बाहेर गेले आणि त्यानंतर कोविड-१९ मुळे लागू झालेल्या आंतरराष्ट्रीय प्रवास निर्बंधांमुळे ज्यांना ऑस्ट्रेलियात येता आले नाही, त्यांच्या व्हिसाची मुदत ३० सप्टेंबर २०२२पर्यंत वाढविण्यात येणार आहे. पात्र पदवीधरांना बदली व्हिसासाठी अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी ही मुदत देण्यात आली आहे.

‘मास्टर्स बाय कोर्सवर्क’ पदवीधरांमधील तात्पुरत्या पदवीधर व्हिसाधारकांच्या (उपवर्ग ४८५) मुक्कामाची मुदत दोन (२) वरून तीन (३) वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे. ‘मास्टर्स बाय रिसर्च’ पदवीधरांसाठीच्या विद्यमान तरतुदींशी जुळणारी ही सवलत आहे. व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण (व्हीईटी) क्षेत्रातील पदवीधरांनादेखील दोन (२) वर्षांचा तात्पुरता पदवीधर व्हिसा मिळेल.

या उपक्रमांबद्दल बोलताना ऑस्ट्रेलियाच्या सरकारच्या ऑस्ट्रेलियन व्यापार व गुंतवणूक आयोगाच्या वरिष्ठ व्यापार व गुंतवणूक आयुक्त डॉ. मोनिका केनेडी म्हणाल्या, “२२ नोव्हेंबर २०२१ (जेव्हा ऑस्ट्रेलियन सरकारने विद्यार्थ्यांसाठी सीमा उघडण्याची घोषणा केली) ते १८ मार्च २०२२ या काळात भारतीय नागरिकांनी २८,७८५ विद्यार्थी व्हिसा दाखल केले आहेत. २०२२मधील पहिल्या सेमिस्टरचा अभ्यास सुरू करण्यासाठी भारतीय विद्यार्थी ऑस्ट्रेलियात परत येऊ शकतील याची खातरजमा करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या सरकारने विद्यार्थी व्हिसावर प्रक्रिया करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत. या संदर्भात अनेक अर्ज दाखल करण्यात आले होते. २२ नोव्हेंबर २०२१ ते १८ मार्च २०२२ या कालावधीत त्यांतील १५,३१० अर्जांवर प्रक्रिया यशस्वी होऊन हे व्हिसा मंजूर झाले आहेत. तसेच, ऑस्ट्रेलियाच्या उत्कृष्ट शिक्षण संस्थांमध्ये दाखल होण्यासाठी किंवा आपला अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्यासाठी २५ हजारांहून अधिक विद्यार्थी आमच्या देशात येत आहेत.

‘स्टडी ऑस्ट्रेलिया’ योजना आणि भारतीय विद्यार्थ्यांसाठीचे सहाय्य यांविषयीची अधिक माहिती https://www.studyaustralia.gov.au/india या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading