अतिक्रमण कारवाई दरम्यान जोरदार राडा, स्थानिकांकडून महापालिका अधिकाऱ्यांना बेदम मारहाण  

पुणे : धानोरी येथे अतिक्रमण कारवाई दरम्यान जोरदार राडा झाल्याचे समोर आले आहे. यावेळी सुमारे शंभर ते दोनशे जणांच्या जमावाने पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवत दगडफेक करायला सुरूवात केली. त्यावेळी पालिका कर्मचाऱ्यांना घटना स्थळांवरून काढता पाय घ्यावा लागला. पण स्थानिक एव्हडयावरच थांबले नाहीत. त्यांनी कारवाई करण्याऱ्या पालिका कर्मचाऱ्यांचा अक्षरशः पाठलाग करत त्यांना बेदम मारहाण केली. हा सर्व धक्कादायक प्रकार आज दुपारी 3 च्या सुमारास धानोरी येथे घडला. 

आज पुणे महापालिकेच्या अतिक्रमण व बांधकाम विभागाकडून धानोरीत दुपारी दीडच्या सुमारास संयुक्त अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू करण्यात आली. यामध्ये पदपथावरील, पथारी व्यावसायिक विक्रेत्यांची अतिक्रमणे ताब्यात घेण्यापासून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर इमारतींना लागून केलेल्या पत्राशेड व इतर तात्पुरत्या स्वरूपातील अतिक्रमणांवरही जेसीबी यंत्राच्या साह्याने मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. ही कारवाई करत पालिकेचे पथक धानोरी गावठाण परिसरात पोहचले. याठिकाणी एका पत्राशेडवर कारवाई करत हे पत्राशेड जमीनदोस्त केले. यावेळी बघ्यांची व स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. याचदरम्यान स्थानिक नागरिक व पालिका कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी सुरू झाली. याचवेळी काही जणांनी जेसीबीवर दगडफेक केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पालिका अधिकारी जागेवरून दूर निघून गेले, तर जेसीबी चालकही जेसीबी सोडून निघून गेला.

पालिकेच्या कारवाईत झालेली नुकसानभरपाई मिळाल्याशिवाय जेसीबी यंत्राचा ताबा सोडणार नसल्याचा पवित्रा स्थानिक नागरिकांनी घेतला. दरम्यान, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पालिका पथकातील खाकी वर्दीतील सुरक्षा व इतर कर्मचारी जमावाच्या निदर्शनास पडले. त्यामुळे जमावाने या कर्मचाऱ्यांकडे धाव घेत अक्षरशः त्यांचा पाठलाग करत त्यांना बेदम मारहाण केली. यावेळी या घटनेचे चित्रण करणाऱ्या दोन-तीन व्यक्तींचे मोबाईलही जमावातील व्यक्तींनी फोडले. दरम्यान, या घटनेबाबत पालिकेच्यावतीनं विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दुपारी साडेतीन नंतर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

या कारवाईसाठी पालिकेच्या पथकाला पालिकेच्या पोलिसांचे संरक्षण देण्यात आले होते. मात्र जमावाकडून पालिका कर्मचाऱ्यांना मारहाण होत असताना पोलीस अधिकारी व कर्मचारी जेवायला गेले होते. सर्व घटना घडून गेल्यानंतर पालिकेचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी काही एक बोलण्यास नकार दिला.

Leave a Reply

%d bloggers like this: