पुस्तक वाचनामुळे व्यक्तिमत्त्वाला मिळतो आकार – एकनाथ आव्हाड
पुणे : आयुष्यात कला अतिशय महत्त्वाची असते. कलेला सोबत घेऊन जगणे महत्त्वाचे असून कलेमुळे आपण घडत असतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध बालसाहित्यिक आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक एकनाथ आव्हाड यांनी व्यक्त केले. पुस्तकं माणूस जोडण्याचे काम करतात, म्हणूनच आपण पुस्तकांना आपले मित्र म्हणतो. लेखकांची आणि पुस्तकांची ताकद मोठी असून दर्जेदार पुस्तकांच्या वाचनामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार मिळतो, असे त्यांनी नमूद केले.
नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे सुमन नाट्यछटा लेखन स्पर्धा २०२० -२१ मधील पारितोषिक विजेत्या निवडक नाट्यछटा पुस्तकरूपात संकलित करण्यात आल्या आहेत. या ‘सुमन नाट्यछटा’ पुस्तकाचे प्रकाशन जागतिक रंगभूमीदिनी करण्यात आले. त्यावेळी आव्हाड बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, नाट्य संस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी, विश्वस्त संध्या कुलकर्णी, दिपाली निरगुडकर व्यासपीठावर होते.
आव्हाड म्हणाले, “प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येते, त्या संधीचे आपण सोने कसे करतो ते आपल्या हातात आहे. मनापासून जीव ओतून काम केले तर यशापासून आपण दूर राहू शकत नाही. कोणतंही काम करताना आपल्यात सकारात्मकता असायला हवी.” विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आव्हाड यांनी आयुष्याचे सार सांगितले. “माणूस माणसाला खऱ्या अर्थाने ओळखेल तेव्हा खरी पहाट होईल, आयुष्यात काहीतरी करायचे असेल तर आधी आपण उत्तम माणूस व्हायला हवे. माणूस जोडला तर देश जोडला जाईल.
या वेळी प्रकाश पायगुडे यांच्या हस्ते नाट्यसंस्कार प्रथम परीक्षेत यशस्वी झालेल्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. अमोल जाधव आणि क्षितीजा आगाशे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
पारखी यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याची आणि उपक्रमांची माहिती दिली. रंगभूमीदिनाचे निमित्त असून वर्षभर नाटक या कलेचा जागर करणे हा संस्थेचा मूळ उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. क्षितीजा आगाशे आणि सायली पाटील यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले तर दिप्ती असवडेकर यांनी आभारप्रदर्शन केले.
