असमान पाणी पुरवठ्याला भाजपाइतकीच कॉंग्रेस-राष्ट्रवादीही जबाबदार -आम आदमी पार्टी
पुणे : पुण्यातील पाणी प्रश्नावरुन राजकारण तापलं आहे. खासदार गिरीश बापट हे कालवा समितीच्या बैठकीतून तावातावात बाहेर पडले होते.आयुक्तांच्या घरच्या पाण्याचे प्रेशर मोजण्याची नौटंकी चालू आहे. यावरून भाजपा-राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोप सरू आहेत. मात्र, पाण्याच्या या प्रश्नाला भाजपा इतकेच कॉंग्रेस व राष्ट्रवादी हे दोघेही जबाबदार आहेत, अशी टीका आपचे जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी केली.
मुकुंद किर्दत म्हणाले, २४ तास पाणी योजनेचे काम सुरु केले गेले. त्याला अपुरा आणि असमान पाणी वाटप, गळती या बाबत त्यावेळी सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी-काँग्रेसचे अपयश कारणीभूत होते. या योजनेपोटी सामान्य पुणेकर पाण्यासाठी २०१६-१७ पासून दरवर्षी वाढीव कर भरतो आहे. या योजनेत महानगरपालिका व केंद्र सरकार यांचे पैसे गुंतले आहेत. असे असताना गेल्या पाच वर्षात भाजपाच्या सत्ताकाळातही फारशी प्रगती झालेली नाही.आता मनपामध्ये राष्ट्रवादीच्या इच्छेने नवीन गावे समाविष्ट झाली आहेत.
त्यामुळे या अपयशाचे खापर कुणाच्या डोक्यावर फोडायचे हा या भाजपा, महाविकास आघाडी समोरचा प्रश्न आहे. महानगरपालिका निवडणुकीचे ‘प्रेशर’ आल्याने भाजपानेते आयुक्तांच्या घरी जाऊन नौटंकी करत आहेत. तर राष्ट्रवादीलाही ‘प्रेशर रिलीफ’ची गरज असल्याने रंजक प्रतिवाद करीत तोंडसुख घेत आहेत, अशी टीका किर्दत यांनी केली आहे.
महापालिकेतील भाजपाची सत्ता संपून पंधरा दिवस झाले नाहीत तोवर अपुऱ्या पाण्याचा प्रश्न सुरू झाला. मुळात याआधी पाणी पुरवठ्याचा प्रश्न होताच. मात्र, स्वत:ची सत्ता असताना गप्प राहिलेली भाजपा आता सत्ता गेल्यानंतर या विषयावरून गळा काढत असल्याची टीका महाविकास आघाडीकडून होत आहे. मात्र, आपच्या किर्दत यांनी या स्थितीस केवळ भाजपा नव्हे तर याआधी महापालिकेत सत्ता भोगलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादीलाही जबाबदार धरले आहे.
