बहुविद्याशाखीय शिक्षण पद्धत अवलंबण्याची आवश्यकता – प्रो.अनिल सहस्रबुद्धे

पुणे : ‘बहुविद्याशाखीय शिक्षण पद्धत ही आजच्या काळासाठी अतिशय गरजेची आहे. एकेकाळी मुंबई, कलकत्ता, मद्रास यांसारख्या विद्यापीठांमध्ये अवलंबली जाणारी ही शिक्षणपद्धत नंतरच्या काळात मात्र बदलत गेली. पुढे ठराविक ‘स्पेशलायझेशन’वर भर असणारी शिक्षणपद्धत रुढ झाली. मात्र आज पुन्हा एकदा बहुविद्याशाखीय शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. सरकारचे नवे शैक्षणिक धोरण हे या शिक्षण पद्धतीला अनुसरूनच आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आवश्यक आणि समग्र असे शैक्षणिक धोरण स्वीकारणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरला आहे,‘ असे मत ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई)चे अध्यक्ष प्रो. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केले.

डी.वाय.पाटील आंतराष्ट्रीय विद्यापीठ,आकुर्डी’च्या पहिल्या पदवीदान समारंभाला प्रो. सहस्त्रबुद्धे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलपती डॉ.संजय पाटील, कुलगुरू प्रो. प्रभात रंजन, डी. वाय. पाटील प्रतिष्ठान’चे विश्वस्त तेजस पाटील, डॉ. मधुरा जगताप, डॉ.नीरज व्यवहारे, डॉ मुकेश पराशर आदी मान्यवर व्यापीठावर उपस्थित होते.

यावेळी विद्यापीठातील एमबीए (कृषी व्यवसाय), बीबीए , बीसीए, बी कॉम, बी ए (जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन), बीएससी बायोटेक्नॉलॉजी, डी फार्मा आदी अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या ११२ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. तसेच स्वतःचा उद्योग सुरू करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना ‘बडिंग आंतरप्रेनर’ हा विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

नवीन शैक्षणिक धोरणाच्या वैशिष्ट्यांबाबत बोलताना प्रो. सहस्त्रबुद्धे म्हणाले, “सरकारने २०२० मध्ये लागू केलेले नवे शैक्षणिक धोरण हे बहुविद्याशाखीय शिक्षण पद्धतीला अनुसरूनच आहे. लवचिकता हे या धोरणाचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना एका शाखेतून दुसऱ्या शाखेत सहजपणे जाणे शक्य होणार आहे. एका शाखेतून दुसऱ्या शाखेत जाण्याची मुभा असताना, त्याने पूर्ण केलेल्या अभ्यासक्रमाची देखील दखल घेतली जाईल. विद्यार्थ्यांना एकाचवेळी आवडीच्या विविध शाखांमधील अभ्यासक्रम शिकण्याची संधी यात मिळेल. एका अर्थाने हे एक विद्यार्थीभिमुख धोरण आहे.”

विद्यार्थ्यांना मागर्दर्शन करताना सहस्त्रबुद्धे म्हणाले, “जर नावीन्यपूर्ण संकल्पनांचा ध्यास घेणार असाल, संशोधन करणार असाल तर, ‘दहा ते पाच‘ काम करण्याची सरधोपट मानसिकता बदलावी लागेल. ध्यास पूर्ण करण्यासाठी चोवीस तासही कमी पडायला लागतील तेव्हा खरा बदल दिसू लागेल. आजच्या काळात चाकोरीबद्ध विचार नको आहे, ‘आउट ऑफ द बॉक्स‘ विचार हवे आहेत!”

Leave a Reply

%d bloggers like this: