मर्ढेकरांच्या घराच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुढाकार
पुणे : युगप्रवर्तक कवी बा. सी. मर्ढेकर यांच्या मर्ढे (जि. सातारा) या गावी महाराष्ट्र शासनाने त्यांचे स्मारक उभे केले असले तरी मर्ढेकरांचे राहते घर नामशेष होण्याच्या मार्गावर होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सातारा जिल्ह्यातील शाहूपुरी शाखेने मर्ढेकरांच्या घराच्या दुरुस्तीसाठी पुढाकार घेतला असून त्यासाठी लागणाऱ्या निधीची व्यवस्थाही केली आहे. हे काम वेगाने सुरु असून लवकरच ते पूर्ण होईल अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
प्रा. जोशी म्हणाले, “मर्ढेकरांचे चाहते तसेच लेखक, अभ्यासक आणि संशोधक जेव्हा मढर्याला येतात तेव्हा मर्ढेकरांच्या घराला आवर्जून भेट देतात. हे लक्षात घेऊन दुरवस्था झालेल्या घराची दुरुस्ती करण्याचे काम महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी यांनी शाहूपुरी शाखेच्या माध्यमातून हाती घेऊन त्यासाठी निधीही उभा केला. घराची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर घरात मर्ढेकरांचे तैलचित्र लावण्यात येणार असून त्यांचा जीवनप्रवास रेखाटण्यात येणार आहे. मर्ढेकरांच्या गाजलेल्या कवितांचे फलकही तेथे लावण्यात येणार आहेत. घराच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर मर्ढेकरांना अभिवादन करणाऱ्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन मर्ढे येथे करण्यात येणार आहे.
