महाराष्ट्राचा वस्तुनिष्ठ इतिहास मी मांडण्याचा प्रयत्न केला – डॉ. सदानंद मोरे

पुणे : महाराष्ट्राचा इतिहास लिहिताना जिथे वस्तुस्थिती समोर आली नाही किंवा जाणीवपूर्वक आणली गेली नाही असे मला वाटले त्या ठिकाणी मी वस्तुस्थिती सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न मी माझ्या लिखाणातून केला असल्याचे परखड मत संत साहित्य व आधुनिक महाराष्ट्राचे अभ्यासक डॉ.सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात डॉ. मोरे यांच्या लेखनसाहित्यावर ‘महाराष्ट्र चतुष्टय’ या चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चासत्राचे उद्घाटन डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.गो.बं.देगलूरकर यांच्या नेतृत्वाखाली झाले, तर बीजभाषण डॉ. राजा दीक्षित यांनी केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र- कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, संत तुकाराम अध्यासनाचे प्रमुख डॉ. अभय टिळक, संत ज्ञानेश्वर अध्यासनाचे प्रमुख डॉ. दिलीप धोंडगे, मराठी भाषा विभागप्रमुख डॉ. प्रभाकर देसाई, डॉ. मोरे यांच्या पत्नी सुरेखा मोरे आदी यावेळी उपस्थित होते.

डॉ. मोरे म्हणाले, विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करताना माझ्या लेखनातील अनेक पैलू उलगडण्यासाठी मला येथे पोषक वातावरण मिळाले आणि त्यातून माझ्या आवडीचा विस्तार झाला.

डॉ. राजा दीक्षित म्हणाले, आपल्याकडे इतिहास लेखन विपुल प्रमाणात झाले असले तरी इतिहासाचे चिंतन झालेले नाही. ते चिंतन मोरेंच्या लिखाणात दिसते. मोरे यांचं लिखाण म्हणजे महाराष्ट्राचे विश्वरूप दर्शन आहे. त्यांनी तपशिलांची रास मांडताना तत्वाची कास सोडली नाही.

कार्यक्रमाच्या पुढच्या सत्रात निबंधवाचन व चर्चा करण्यात आली.

डॉ. सदानंद मोरे यांचे साहित्य हे आंतरशाखीय

डॉ. सदानंद मोरे यांचे साहित्य हे आंतरशाखीय आहे. तोच प्रयत्न प्रशाला पद्धतीच्या माध्यमातून आम्ही विद्यापीठात आणला आहे. प्रा. मोरे हे विद्यापीठाचेच असले तरी त्यांच्या साहित्यातून ते महाराष्ट्रभर पोहोचले आहेत. त्यामुळे त्यांच्या साहित्यावर आधारित चतुष्टय महाराष्ट्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून चर्चा विद्यापीठात घडली हे अभिमानास्पद बाब आहे.

– डॉ. नितीन करमळकर (कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)

Leave a Reply

%d bloggers like this: