इतिहास हे पुराव्यांवर आधारलेले एक शास्त्र – पांडुरंग बलकवडे

पुणे : इतिहासाचार्य वि.का.राजवाडे यांनी सन १९०९ साली भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज, पेशवे यांसह विविध सरदारांची तब्बल २५ लाख मोडी भाषेतील पत्रे येथे उपलब्ध आहेत. मोडीतील पत्रांसह, ताम्रपट, फर्माने, नाणी, शस्त्रे देखील येथे आहेत. या सर्व गोष्टींचा अभ्यास आजही सुरु असून इतिहास हे पुराव्यांवर आधारलेले एक शास्त्र आहे, असे मत इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी व्यक्त केले. 

शिवगर्जना प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज – इतिहासकालीन पत्रातून शिवदर्शन या उपक्रमांतर्गत सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधन मंडळात हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले. यावेळी अ‍ॅड.गणेश सातपुते, बाबू वागस्कर, शहराध्यक्ष वसंत मोरे, किशोर शिंदे, रणजित शिरोळे, वनिता वागस्कर, जयराज लांडगे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवरायांशी निगडित इतिहासकालीन पत्रे उपस्थितांना पहायला मिळाली. तसेच हेरिटेज वॉक व  इतिहासकालीन पत्रातून शिवाजी महाराज देखील जाणून घेतले. 

पांडुरंग बलकवडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म, संस्कृती, समाज, राष्ट्र संरक्षण केले. रयतेचे राज्य निर्माण केले. शिवरायांनी त्यागमय आदर्श समाजासमोर ठेवला. सन १६८९ मध्ये रायगड किल्ला शत्रूच्या ताब्यात होता. त्याच वेळी दप्तर खान्यातील २० लाख कागदपत्रे जळून खाक झाली. त्यामुळे शिवरायांचा सरकारी दप्तरखाना नष्ट झाला असून आज उपलब्ध नाही. इतिहास संशोधन मंडळातील जी पत्रे आज उपलब्ध आहेत, असा मराठा साम्राज्याच्या पत्रांचा खजिना इतरत्र कोठेही उपलब्ध नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

अ‍ॅड. गणेश सातपुते म्हणाले, शिवजयंती हा सण म्हणून सर्वत्र साजरा होतो. मात्र, शिवरायांचा पत्रातून इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. इतिहास संशोधन मंडळात ऐतिहासिक पत्रांचे भांडार आहे. मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा हा खरा खजिना आपण जतन करुन सर्वांपर्यंत पोहोचवायला हवा, असेही ते म्हणाले. अ‍ॅड.गणेश सातपुते यांसह महेश महाले, योगेश खैरे, संतोष पाटील, आशिष देवधर, गणेश भोकरे यांनी उपक्रमाच्या संयोजनात सहभाग घेतला.

Leave a Reply

%d bloggers like this: