स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘नरवीर तानाजी रन’

पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त सदर्न कमांड, मुख्यालय आणि इंद्राणी बालन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नरवीर तानाजी रन’ आयोजित करण्यात येत आहे. येत्या 2 एप्रिल 2022 रोजी सकाळी 6:00 वाजता राजगड ते सिंहगड किल्ल्यापर्यंत ही साहसी आणि आव्हानात्मक रन होईल. या रनचे हे पहिलेच वर्ष आहे. ही रन राजगड किल्ल्याच्या पायथ्यापासून सुरू होईल आणि सिंहगड किल्ल्यावर संपेल. सुमारे 20 किलोमीटरहून अधिक अंतराचा हा क्रॉस-कंट्री मार्ग असेल. स्पर्धात्मक पार्श्‍वभूमीशिवाय ही एक ‘ट्रेलब्लेझर रन’ असणार आहे.

सदर्न कमांड, मुख्यालय आणि इंद्राणी बालन फाऊंडेशन यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ‘नरवीर तानाजी रन’ ला या क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेल्या नॅशनल एज्युकेशन फाऊंडेशन (NEF) यांचे तांत्रिक सहकार्य लाभले आहे. इंद्राणी बालन फाऊंडेशन त्यांची सामाजिक जबाबदारी म्हणून या कार्यक्रमाला सक्रिय पाठिंबा देत आहे. हा एक अनोखा उपक्रम असेल जो सशस्त्र दलातील कर्मचारी आणि नागरीकांना एकत्र आणेल.

छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांनी 4 फेब्रुवारी 1670 रोजी आपल्या प्राणाची आहुती देऊन तत्कालीन  कोंढाणा म्हणजे आताचा सिंहगड किल्ला जिंकला होता. त्यांच्या या बलिदानाचा सन्मान करत ‘मराठा लाइट इन्फंट्री’ 4 फेब्रुवारी हा त्यांचा ‘रेजिमेंटल डे’ म्हणून साजरा करतात. या पार्श्वभूमीवर २ एप्रिल २०२२ रोजी राजगड किल्ल्यावरून एक आव्हानात्मक आणि सहनशक्तीचा कस लागणारा ट्रेक आयोजित केला आहे. सिंहगड किल्ला जिंकण्यासाठी तानाजी मालुसरे आणि त्यांच्या सहकारी मावळ्यांनी ज्या मार्गाचा अवलंब केला होता त्याच मार्गावर हा ट्रेक होणार आहे.

या ‘नरवीर तानाजी रन’मध्ये एकूण 351 स्पर्धक सहभागी होतील, त्यापैकी 151 नागरी खेळाडू असतील, तर उर्वरित सशस्त्र दलातील कर्मचारी असतील. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर सामान्य नागरिकांना प्रवेशिका दिल्या जाणार आहेत. यामध्ये सहभाग घेण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क घेतले जाणार नसून सर्व स्पर्धकांना फिनिशर मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.

‘नरवीर तानाजी रन’मध्ये सहभागी स्पर्धक आणि सर्वसामान्यांमध्ये देशभक्ती जागवण्यासाठी सिंहगड किल्ल्यावर लष्करी बँड आणि शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन देखील असणार आहे. या कार्यक्रमाला लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन (पीव्हीएसएम, एव्हीएसएम, एसएम, जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ, सदर्न कमांड) हे उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: