अन्याय, अत्याचाराचा प्रतिकार करायला शिका – डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे : आपल्या हातात शस्त्र काय आहे; या पेक्षा अन्याय, अत्याचाराच्या विरुद्ध प्रतिकारशक्ती प्रत्येक महिलांच्या अंगी असायला पाहिजे. शिवसेना महिला आघाडी असतांना चोरांना, छेडछाड करणाऱ्या माणसांना तुमची भीती वाटली पाहिजे असे सामर्थ्य विकसित करा. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन आपल्या सेवेत आहे. काहीही अनुचित प्रकार नजरेस पडत असेल तर त्यांची सुचना पोलीसांपर्यंत पोहचवण्यात सहकार्य करा, असा सल्ला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी महिला भगिनींना दिला.
शिवसेना महिला संवाद कार्यक्रमा अंतर्गत शिवसेना उपनेत्या व महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघातील युवती व महिलांशी संवाद साधला, यावेळी त्या बोलत होत्या. हडपसर विधानसभा मतदारसंघातील कोंढवा बुद्रुक येथील बहूद्देशीय हॉल येथे झालेल्या संवाद कार्यक्रमाला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
महिला वर्गाला मार्गदर्शन करून त्यांच्याशी मनमोकळेपणाने चर्चा करत महिलांची सुरक्षा, रोजगार, आरोग्य, शिक्षण अशा विषयांवर व अडीअडचणीवर प्रकाश टाकला. सरकार व प्रशासनाच्या दृष्टीने तसेच शिवसेनेच्यावतीने याप्रश्नी शक्य ते प्रयत्न करण्याचे आश्वासन देखील डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी दिले. या प्रसंगी त्यांच्यासोबत सह संपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, माजी आमदार महादेव बाबर, शहरप्रमुख संजय मोरे, हे देखल उपस्थित होते.
डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, उद्योजक महिलांसाठी विविध योजना आहेत, या योजनांचा लाभ अधिकाधिक महिलांनी घ्यावा. महिलांनी उद्योग- व्यवसायातही गुणात्मक वाढ करून यशस्वी उद्योजक ह्वावे.
हडपसर संवाद मेळाव्यांचे आयोजन संगिता ठोसर आणि प्राची आल्हाट यांनी केले होते. यावेळी आदित्य शिरोडकर, संजय मोरे, महादेव बाबर यांनी देखील संवाद सभेला संबोधीत केले. सुत्रसंचालन विद्या होडे यांनी तर आभार वैष्णवी घुले यांनी मानले.