fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

भरगच्च कार्यक्रमांनी दोन दिवसीय इनोफेस्ट २०२२ संपन्न

पुणे :  स्टार्टअप विषयक अनेक विषयात तज्ज्ञांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांचे स्टार्टअप सादरीकरण, इनोव्हेशन टू एंटरप्राइजेस स्पर्धेचे बक्षीस वितरण त्यासोबतच महाविद्यालय व प्राध्यापकांसाठीच्या ‘ई कंटेंट’ पुरस्कारांची घोषणा अशा भरगच्च कार्यक्रमांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘इनोफेस्ट २०२२’ पार पडला.

यंदाच्या वर्षी इनोफेस्ट २०२२ अंतर्गत आयोजित दोन दिवसीय शिखर परिषद विद्यापीठातील संत नामदेव महाराज सभागृहात पार पडली. या परिषदेत अमेरितील गर्जे मराठी समूहातील प्रतिनिधी आनंद गानू यांच्यासह अजय हिरासकर, मंदार म्हात्रे, वंदना सक्सेना, मृदुल शर्मा आदी नामांकित कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते. या परिषदेच्या सांगता समारंभात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, डॉ. एन.एस.उमराणी, पराग फाटक, श्रीरंग गोडबोले आदी उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य केंद्राच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर यांनी केले. यावेळी पुण्यात झालेली स्टार्टअपमधील गुंतवणूक या विषयीचा अहवालही प्रकाशित करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या समारोपात ई कंटेंट पुरस्कारार्थींना गौरविण्यात आले. यामध्ये ‘बेस्ट फॅक्लटी’ आणि ‘बेस्ट कॉलेज’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच महाविद्यालयीन पातळीवर घेण्यात आलेल्या ‘इनोव्हेशन टू एंटरप्राइजेस’ या स्टार्टअप विषयक स्पर्धेच्या विजेत्यांना एक लाख व पन्नास हजार असे बक्षीस देण्यात आले. या स्पर्धेसाठी एक हजार ३९९ टीम सहभागी झालेल्या. त्यातील १०० जणांची निवड करण्यात आली होती. त्यातून ३८ टीम स्टार्टअपसाठी निवडण्यात आल्या आहेत अशी माहिती डॉ. पालकर यांनी दिली.

स्टार्टअप साठी एक परिसंस्था निर्माण करण्याचा प्रयत्न
“पुणे स्टार्टअप सिटी म्हणून नावारूपाला येत असताना विद्यापीठात स्टार्टअप साठी एक परिसंस्था निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांना अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीपासून ते आयआयटी, कंपन्यांचे तज्ज्ञ, कायदेविषयक तज्ज्ञ असे सर्वांगीण व्यासपीठ देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

– डॉ. अपूर्वा पालकर, संचालिका, इनोव्हेशन सेल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

 नवे स्टार्टअप या विद्यापीठातून निर्माण व्हावेत
“विद्यापीठात स्टार्टअपच्या दृष्टीने परिपूर्ण वातावरण देण्याचा आमचा प्रयत्न असून त्यासाठीच ‘एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशन’, इनोव्हेशन सेल, सीफोरआयफोर आदी संस्था या विद्यापीठ परिसरात निर्माण केल्या आहेत. या माध्यमातून नवे स्टार्टअप या विद्यापीठातून निर्माण व्हावेत असा आमचा मानस आहे.”

– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading