वडगावशेरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

पुणे : वडगावशेरीतील सनसिटी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण आणि शिवसृष्टी व १५० फूट उंचीच्या राष्ट्रध्वजाचे लोकार्पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शहर अध्यक्ष जगदीश मुळीक अध्यक्षस्थानी होते. नगरसेवक योगेश मुळीक यांच्या प्रयत्नांतून तीनही प्रकल्प सुरू करण्यात आले.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत चार राज्यांत भाजपने मिळविलेल्या यशाने महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या पायाखालील वाळू सरकली असून, त्यामुळेच विविध कारणे सांगून राज्यातील महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जात असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या वेळी बोलताना केली.

पाटील पुढे म्हणाले, पुण्यात केव्हाही निवडणुका झाल्या तरी भाजपचे १०० हून अधिक नगरसेवक निवडून येतील असा विश्वास आहे. काही नगरसेवक पक्षांतर करतील अशा वावड्या उठविण्यात आल्या होत्या. परंतु त्यात काहीही तथ्य नव्हते. उलट चार राज्यातील निवडणुकीतील यशामुळे भाजपमध्येच मोठ्या प्रमाणात इनकमिंग होऊ शकते.

जगदीश मुळीक म्हणाले, कॉंग्रेस राष्ट्रवादीने गेली अनेक वर्षे नुसतीच आश्वासने दिली. त्यांच्या काळात प्रकल्प कागदावरच राहिले. भाजप सत्तेत आल्यानंतर मेट्रो, भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्प, समान पाणीपुरवठा योजना, पीएमपीएमएलच्या ताफ्यात बसेसची खरेदी, नदी शुद्धीकरण प्रकल्प, नदीकाठ सुशोभिकरण प्रकल्प, आरोग्य सेवांचे सक्षमीकरण, समाविष्ट गावांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे आदी प्रकल्प मार्गी लागले आहेत. त्यामुळे यावेळी महापालिकेत भाजपच सत्तेत येर्इल याचा विश्वास वाटतो.

योगेश मुळीक म्हणाले, वडगांव शेरी, कल्याणीनगर परिसरात विविध विकासकामे केली. स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची संधी मिळाल्यावर भामा आसखेड पाणीपुवठा योजनेला १८५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करून काम पूर्ण केले. नगर रस्त्यावर पाच उड्डाणपुलाचे नियोजन केले त्यापैकी गोल्फ चौकातील उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. उर्वरित चार पुलांचे काम राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळ करणार आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी आमदार बापूसाहेब पठारे, योगेश टिळेकर, नगरसेवक सिद्धार्थ धेंडे, बाबुराव कर्णे गुरुजी, शीतल शिंदे, श्वेता गलांडे, ऐश्वर्या जाधव, अनिल टिंगरे, मारुती सांगडे, मुक्ता जगताप, राहूल भंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

नगरसेवक योगेश मुळीक यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. तर संतोष घोलप यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: