INTERVIEW – बँड बाजा वरात म्हणजे प्री-वेडिंग धमाल – पुष्कराज चिरपुटकर

प्रेक्षकांना आपलासा वाटणारा पुष्कराज चिरपुटकर लवकरच बँड बाजा वरात या कार्यक्रमातून त्यांच्या भेटीस येणार आहे. हा कार्यक्रम १८ मार्च पासून शुक्रवार आणि शनिवार रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांसाठी सादर होणार आहे. पुष्कराज या कार्यक्रमात सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहे त्यामुळे त्याच्यासोबत साधलेला हा खास संवाद
१. प्रोमोजमधून कार्यक्रमाचं स्वरूप खूपच वेगळं दिसतंय, या कार्यक्रकाविषयी काय सांगशील?
– हो या कार्यक्रमाचं स्वरूप खूपच वेगळं आहे. रिऍलिटी शो म्हंटल कि आपल्याला गाणं किंवा डान्सची स्पर्धा डोळ्यासमोर येते पण या कार्यक्रमात लग्न ठरलेली जोडपी आणि त्यांची कुटुंबं सहभागी होणार आहेत आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा होणार आहे, त्यांच्यासोबत वेगवेगळे खेळ खेळले जातील आणि विजेत्यांना बक्षिसं मिळतील. त्यामुळे या कार्यक्रमाला आपण प्री-वेडिंग धमाल असं म्हणू शकतो.
२. कार्यक्रमातील तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगाल?
– मी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. आणि जे टिपिकल सूत्रसंचालन आहे ते न करता काही तरी वेगळं करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, ज्यात ह्युमर आणि कुटुंबं व कार्यक्रमाला जोडणाऱ्या भावना यांचा मेळ असेल.
३. कार्यक्रमाच्या प्रोमोजनंतर प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतोय?
– प्रेक्षकांकडून खूप जास्त चांगला प्रतिसाद मिळतोय. मी जवळपास ५ वर्षांनंतर झी मराठीवर परतलो आहे त्यामुळे प्रेक्षकांकडून खूप चांगलं वेलकम झालं तसंच पहिल्यांदा मी झी मराठीवरील एका कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतो आहे त्यामुळे सगळ्यांना उत्सुकता तर आहेच पण त्याचसोबत एक प्रश्न देखील पडला आहे. हा कार्यक्रम लग्नासंदर्भात आहे आणि पुष्कराजच तर लग्नच झालेलं नाही. पण त्याबद्दल माझा काय स्टॅन्ड आहे हे प्रेक्षकांना लवकरच कार्यक्रमातून कळेल.
४. या कार्यक्रमात तुझ्यासोबत रेणुका शहाणे असणार आहेत, तू सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहेस, तुमच्या सॉलिड टीमबद्दल काय सांगाल?
– रेणुका ताईची या कार्यक्रमात एक महत्वपूर्ण भूमिका आहे. ती अभिनेत्री म्हणून तर उत्तम आहेच पण माणूस म्हणून देखील ती खूप चांगली आहे. मला या आधी दडपण होतं जेव्हा मला कळलं कि मला रेणुका ताई सोबत काम करायचंय पण तिच्या फ्रेंडली स्वभावामुळे काम कारण सोपं जातंय आणि आमची टीम खरंच सॉलिड बनतेय.
५. शूटींग दरम्यान घडलेला एखादा किस्सा जो तुम्हाला प्रेक्षकांसोबत शेअर करायला आवडेल?

– किस्से आता घडतील. आम्ही शूटिंगला सुरुवात केली आहे. सुरुवातीचे काही एपिसोड्स मी चाचपडत होतो. या कार्यक्रमात सहभागी होणारे लोक हे खूप वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत त्यामुळे त्यांना अभिनय किंवा कॅमेरा समोर वावरायची सवय नसेल असं आम्ही गृहीत धरतो पण जेव्हा काही जण येऊन त्यांचे सुप्त कलागुण दाखवतात आणि ज्या आत्मविश्वासाने कॅमेरासमोर वावरतात ते पाहून कधी कधी आम्ही खूप थक्क होतो.

Leave a Reply

%d bloggers like this: